कोल्हापूर : प्रतिनिधी
खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीप्रकरणी शिवाजी विद्यापीठ प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप करून प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा शुक्रवारी देण्यात आल्या. यासह वेतन फरक मिळालाच पाहिजे, आदी मागण्या करत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने विद्यापीठात निदर्शने करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात दुपारी दोन वाजता कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी हे आंदोलन केले. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम म्हणाले, राज्य शासनाने रिक्त खुल्या प्रवर्ग भरती त्वरित करावी, असे स्पष्ट आदेश दि. 29 डिसेंबर 2017 रोजी विद्यापीठास दिलेले आहेत. विद्यापीठाने या पदोन्नतीप्रकरणी अक्षम्य दिरंगाई करून कार्यवाही पूर्ण केली नाही. पदोन्नतीमध्ये उपकुलसचिव, सहायक कुलसचिवपदावर जवळ-जवळ 90 टक्क्यांहून अधिक पदे राखीव प्रवर्गाची भरल्याने खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांना जून 2016 मध्ये निदर्शनास आणून दिले आहे. त्यासाठी जानेवारी 2017 मध्ये संघाने एक दिवस लाक्षणिक उपोषण केले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आम्ही आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, यापूर्वी आम्ही केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून प्रशासनाने डॉ. पी. डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली; पण ही दिशाभूल होती हे लक्षात आले आहे. कारण कुलसचिवांनी एप्रिलमध्ये सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन संघाला दिले असतानाही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष सुनील देसाई, संजय पसारे, रेहाना मुरसल, बी. एन. बाणदार, संतोष वंगार, मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते.28 मे रोजी उपोषण आंदोलन प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत प्रशासन दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ संघाच्या वतीने दि. 28 मे रोजी उपोषण करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाला कळवले आहे.