Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या कन्यांनी  गाजवली राज्य नेमबाजी स्पर्धा

कोल्‍हापूरच्या कन्यांनी  गाजवली राज्य नेमबाजी स्पर्धा

Published On: Jul 26 2018 1:21PM | Last Updated: Jul 26 2018 1:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

नाशिक येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य एयर वेपन चैंपियनशिप  स्पर्धेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू  अनुष्का पाटील आणि जान्हवी पाटील या बहिणींच्या जोडीने घवघवीत यश मिळवले आहे.

भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र एअर वेपन  स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत  राज्यातून 600 च्या वर नेमबाज तसेच दोनशे प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेत आयएसएसएफ(ISSF)  आणि एनआर (NR) या दोन्ही गटात स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात अनुष्का पाटील हिने आयएसएसएफ गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात  सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने 600 पैकी 558 गुण मिळवत युथ या गटात सुवर्ण पदक पटकावले. याच स्‍पर्धेत जान्हवी पाटीलने एन आर गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तीन सुवर्ण पदकांची कमाई केली. तिने 400 पैकी 365 गुण मिळवत सीनियर, जुनियर आणि युथ या तिन्ही गटात सुवर्ण पदके मिळविली.

अनुष्काने यापूर्वीच भारतासाठी आंतरराष्ट्रीय  सुवर्णपदक आणले आहे. तिच्या पाऊलावर पाऊल ठेवत जान्हवीने कमी कालावधीमध्ये नेमाबाजीचे प्रशिक्षण घेऊन लवकरच बहिणींबरोबर भारताच्या संघामधून आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्न ऊरी बाळगले आहे. अनु-रेणूच्या जोडीने या स्पर्धेत धमाल यश मिळवत स्पर्धा गाजवली. ही जोडी भारतासाठी निश्चितच गौरवास्पद कामगिरी करेल असा चर्चेचा सूर पाहायला मिळाला. 

जान्हवी ऑलम्पिक शूटिंग रेंज येथे विनय पाटील यांच्या तर, अनुष्का ही क्रीडाप्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे व प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाळी येथील छत्रपती संभाजी राजे शूटींग रेंजवर सराव करते.