होमपेज › Kolhapur › श्रावणात त्र्यंबोली देवीला कावडीने पाणी आणि अंबील

श्रावणात त्र्यंबोली देवीला कावडीने पाणी आणि अंबील

Published On: Sep 01 2018 10:33AM | Last Updated: Sep 01 2018 10:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापुरात राजर्षी शाहूंनी प्रत्येक समाजाला धार्मिक परंपरेत मानाचे स्थान देऊन सामावून घेतले आहे. अशा समाजापैकीच एक समाज म्हणजे येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज. करवीरची रक्षणकर्ती त्र्यंबोली देवी हीला आषाढ आणि श्रावण महिन्यात कावडीने पाणी वाहून नेण्याचा आणि देवीला अंबील प्रसादासह साडी-चोळीचा आहेर करण्याचा मान गवळी समाजाला शाहू महाराजांनी दिला आहे. तेव्हापासून आजअखेर समाजातील चौथी पीढी देवीच्या पाण्याची ही परंपरा जोपासत आहे. आजही गवळी समाजाकडून देवीला कावडीने पाणी नेण्यात आले. तसेच समाजातील महिलांनी अंबील कलश आणि साडी-चोळीचा मान देऊ केला. 

श्रावण महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवार देवीच्या स्नानासाठी गवळी समाजाने कावडीतून नेलेले पाणीच वापरले जाते. तसेच श्रावणातील अखेरच्या शुक्रवारी देवीला पाणी, अंबील प्रसाद आणि साडी-चोळीचा आहेर केला जातो. तसेच देवीच्या अभिषेकासाठी गवळी समाजातील घराघरांतून दूध, दही, लोणी दिले जाते. गवळी समाजाकडून शुक्रवारी सकाळी कावडीने देवीच्या स्नानासाठी पाणी नेण्यात आले. दुपारी समाजातील महिलांनी सवाद्य मिरवणुकीने अंबील कलश त्र्यंबोली टेकडीला नेले. यावेळी देवीला परंपरेप्रमाणे साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. वीरशैव गवळी समाज ही परंपरा सण म्हणून साजरा करीत असल्याने आजच्या विधीमध्ये संपूर्ण समाजबांधव व महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.