Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Kolhapur › थरारला शिवाजी पूल, गहिवरली पंचगंगा

थरारला शिवाजी पूल, गहिवरली पंचगंगा

Published On: Jan 28 2018 10:30PM | Last Updated: Jan 28 2018 10:30PMकोल्हापूर ः विठ्ठल पाटील

माध्यान्ह रात्रीच्या निरव शांततेचा भंग करणारा मोठा आवाज, पाठोपाठ काळोख भेदणार्‍या किंकाळ्या आणि पाण्यात बुडणार्‍या बससह 13 जणांना मिळालेली जलसमाधी...शुक्रवारी मध्यरात्रीच्या अपघाताची ही भीषणता इतिहासात प्रथमच शिवाजी पुलाने अनुभवली व इंग्रज राजवटीपासून सुमारे 140 वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारा हा पुलही थरारला. नऊ महिन्यांच्या तान्हुलास त्याचे आई-वडिल व अख्खा परिवार आपल्या उदरात अखेरचा श्‍वास घेत असल्याच्या काळाच्या क्रौर्याने पंचगंगासुद्धा काहीकाळ गहिवरली. अपघाताचे हे भीषण वास्तव पाहणार्‍या आणि मदत कार्यात गुंतलेल्यांना या घटनेने अश्रू अनावर झाले.

आंबेवाडीकडून कोल्हापूच्या दिशेने धावत असताना आणि पूल ओलांडण्यासाठी अवघ्या पंधरा-वीस सेकंदांचा अवधी असतानाच बसवर काळाची झडप पडली. पंधरा-वीस फुटांचे अंतर पार केले असते तर बस पुलावरून कोल्हापुरात प्रेवश करणार होती, पण त्यातील तेरा प्रवाशांच्या नशिबी हे नव्हते, अशीच प्रतिक्रिया अपघातस्थळी अनेकांनी व्यक्त केली. या भीषण अपघातामुळे काहीजण झोपत असतानांच त्योचे डोळे कायमचे मिटले, तर जागे असणार्‍यांनी डोळ्यादेखत मरण अनुभवले. मातेसह तिच्या कुशित कायमचाच विसावलेल्या सानिध्य या अवघ्या नऊ महिन्यांच्या तान्हुल्याचा देह पाहून तर उपस्थितांना हुंदका आवरता आला नाही. त्याच्यापेक्षा काही अंतराने मोठ्या असलेल्या लहानग्यांचा मृत्यूसुद्धा अनेकांना चटका लावून गेला.

रात्री साडेअकरा ते पाणेबाराच्या दरम्यान घडलेल्या या अपघाताने सुमारे अर्धातास शिवाजी पुलाखाली मृत्यूचे तांडव सुरु होते. डोळ्यादेखल बस नदीच्या पाण्यात बुडत आहे, पण खिडकीवाटे काहीजणांना बाहेर काढण्यापलिकडे काहीच करू शकत नसल्याचे शल्य मदत करणार्‍या तरुणांना होते. काळोख, थंडी आणि जिवाचीही पर्वा नकरता पाण्यात उतरलेल्या तरुणांच्या मदत कार्यामुळे माणुसकीचा झराच नव्हे तर धावता प्रवाह यानिमित्ताने उपस्थितांना पहायला मिळाला. बुधवारपेठेसह लगतच्या भागातील तरुणांनी जिवाच्या आकांताने नदीच्या दिशेने धाव घेतली. अनेकजणांनी पिकनिक पॉईंटच्या कड्याचा आधार घेत नदीतूनच शिवाजी पुलाखाली पडलेल्या बसच्या दिशेने कूच केली. त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या तरुणांना मोबाईलवर माहिती दिली. त्याबरोबरच आणखी तरुण शिवाजीपुलाखाली धावले. नदीत बुडू लागलेल्या बसमधून एक-एकेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले, पण 16 पैकी तिघांनाच वाचवू शकल्याची खंत त्यांना सतावू लागली.

शिवाजी पुलाच्या परिसरात राहणार्‍यांपैकी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार एवढा मोठा अपघात यापूर्वी कधीच झाला नाही. सत्तर वर्षात अशी घटना घडली नाही किंवा त्यापूर्वी घडल्याचे आपल्या पूर्वजांकडूनही कधी ऐकिवात नसल्याचे सांगण्यात आले. ब्रिटिशकालीन आणि अरुंद पूल असला तरी त्याच्या कठड्याला घासून किरकोळ अपघात अनेक झाले असतील, पण अनेकांच्या जीवावर बेतणारा हा पहिलाच अपघात असल्याचे ब्रम्हपुरी परिसरातील नागरिकांनी सांगितले. पूल ओलांडलांडून पन्हाळ्याकडे जाणार्‍या महामार्गावरील अनेक अपघांची आठवण त्यांच्याकडून सांगण्यात आली. पुलाच्या अलिकडे तोरस्कर चौकालगत असणार्‍या जुन्या पुलाजवळ की जो भरावा टाकून अनेकवर्षापूर्वीच तेथे रस्ता बांधण्यात आला त्याच्या पश्‍चिमेला खुदाई करताना वीस वर्षांपूर्वी पाचजण गाढले गेल्याची आठवणही यानिमित्ताने तेथील रहिवाशांनी सांगितली. शिवाजी पुलावर इतका गंभीर अपघात पहिल्यांदाच घडल्याने तेथील रहिवाशांपैकी अनेकांना रात्रीच्या थंडीतही घाम फुटल्याचे जाणवत होते.