Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Kolhapur › आषाढात दोनच दिवस घुमणार ‘पी ढबाक्’

आषाढात दोनच दिवस घुमणार ‘पी ढबाक्’

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

आषाढातील त्र्यंबोली यात्रा म्हणजे कोल्हापुरातील पेठांत गजबज आणि उत्साह. शुक्रवार दि. 13 जुलै पासून आषाढ सुरू होणार आहे. आषाढ सुरू झाला की  शहरातील पेठांमधील सार्वजनिक तरुण मंडळांकडून त्र्यंबोली यात्रेची तयारी सुरू होते. सध्या आषाढी यात्रेसाठी पेठांत तयारी सुरू झालीच आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया आणि मोबाईल रिंगटोनवरही ‘पी ढबाक्...’चे सर आतापासूनच घुमू लागले आहेत.

यंदा मात्र यात्रेसाठी ऑगस्ट महिना सुरू होण्याची वाट पहावी लागणार आहे. आषाढी एकादशी व पौर्णिमा झाल्याशिवाय यात्रा सुरू होत नाहीत आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या एका मंगळवारी अंगारकी संकष्टी व दुसर्‍या मंगळवारी एकादशी असल्याने ऑगस्ट महिन्यातील शुक्रवार दि. 3 व दि. 10 हे दोनच वार आषाढी यात्रा करता येणार असल्याचे त्र्यंबोलीचे पुजारी शिवप्रसाद गुरव यांनी सांगितले. आषाढ सुरू झाला की पंचगंगेला येणारे नवे पाणी देवीला वाहून रक्षणार्थ देवीची प्रार्थना केली जाते. फार पूर्वीपासून ही प्रथा प्रचलित आहे. नारळीच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून नव्या पाणी व आंबील कलश घेऊन जाण्याची प्रथा होती. आता मात्र या प्रथेला आधुनिक बाज प्राप्‍त झाला आहे. काही ठराविक भागातील यात्रा पूर्ण परंपरेने होतात.  फुलांच्या माळांनी सजवलेले हे कलश आपल्या भागातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत नेण्याचीही प्रथा आहे. त्र्यंबोली टेकडीवर बकर्‍याचा बळी दिला जातो. मात्र, देवीला प्रत्येक घरातून वडी, भाकरी, घुगर्‍या, आंबील असा गोडा नैवेद्यच देण्याची प्रथा आहे. 

शहरातील बहुतांश ठिकाणच्या यात्रा या तिसर्‍या वाराला होतात. आषाढाच्या शेवटी म्हणजे अमावस्येला कुंभार समाजातील म्हेत्तरांची यात्रा होते. याखेरीज ज्या मंडळांची किंवा समाजाची काही कारणास्तव यात्रा राहिली आहे, अशा मंडळांची व समाजाची यात्रा शेवटी अमावस्येच्या दिवशीही केली जाते. मात्र, यावर्षी बहुतांश मंडळांच्या यात्रा आषाढाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 10 रोजी होण्याची शक्यता आहे. कारण  यावर्षी यात्रेसाठी चार मंगळवार आणि चार शुक्रवार मिळत असले तरीही दि. 27 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. दि. 31 जुलैला मंगळवारी अंगारक संकष्टी आहे, दि. 7 ऑगस्ट रोजी एकादशी आली आहे. त्यामुळे यात्रेसाठी ऑगस्ट महिन्यातील दि. 3 व आषाढाचा अखेरचा दिवस म्हणजे शुक्रवार दि. 10 हे दिवस मिळतात.