Sat, Jul 20, 2019 23:37होमपेज › Kolhapur › ...तर ‘थर्टी फर्स्ट’ कोठडीत

...तर ‘थर्टी फर्स्ट’ कोठडीत

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 9:02PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘थर्टी फर्स्ट’ला उत्साहाचा अतिरेक होऊन इतरांच्या आनंदावर विरजन पडणार नाही. याची खबरदारी सार्‍यांनी घ्यावी; मात्र बेधुंद होऊन शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या प्रवृत्तीला थारा मिळणार नाही. हुुल्लडबाजांसह ओपनबार, नशेल्या पदार्थांची तस्करी करणार्‍या सराईतांवर कायद्याचा चाप लावला जाईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी स्पष्ट केले.

शहरासह ग्रामीण भागातील पोलिस रेकॉर्डवरील सराईतांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवून प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत. विशेष करून कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, पेठवडगाव, हुपरी, कागल, मलकापूर, मुरगूड, गारगोटी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज पोलिसांना ‘अ‍ॅलर्ट’च्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोहिते म्हणाले, सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्याबाबत दुमत नाही. होणार्‍या अतिरेकामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी. बेदरकारपणे वाहने पळविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, डॉल्बीच्या निनादात भरचौकात हैदोस माजविणे, दहशत माजविणे अशा कृत्यांना जिल्ह्यात कोठेही थारा दिला जाणार नाही. 

दारू तस्करी रोखण्यासाठी उपाय

कर्नाटकासह गोव्यातून होणारी दारू तस्करी रोखण्यासाठी ठिकठिकाणी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. काही प्रमुख मार्गांवर ‘सीसीटीव्ही’ यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. रात्रंदिवस नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जुगारी अड्ड्यांविरुद्ध मोहीम 

स्किलगेमच्या नावाखाली जिल्ह्यात तीनपानी जुगारी अड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. संबंधित अड्ड्यावर कारवाईच्या स्थानिक पोलिस यंत्रणेला वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तीन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.