Mon, Apr 22, 2019 16:27होमपेज › Kolhapur › उपनगरीय रहिवाशांना सुरक्षिततेची काळजी

उपनगरीय रहिवाशांना सुरक्षिततेची काळजी

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:40AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

तरुण आणि पुरुष वर्ग शिक्षण अथवा नोकरीनिमित्त बाहेर आणि घरी केवळ महिला अथवा ज्येष्ठ नागरिक, अशा परिस्थितीमुळे उपनगरातील रहिवाशांना सुरक्षिततेची काळजी लागली आहे. कोल्हापूर शहराच्या पश्‍चिमेकडील फुलेवाडीपासून राजोपाध्येनगर, साने गुरुजी वसाहत, संभाजीनगर, जरगनगर, पाचगाव, आर.के. नगर, राजेंद्र नगर, मोरेवाडीपर्यंतच्या भागातील नागरिकांना चोरटे आणि गुंडांची काळजी वाटू लागली आहे. करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याची हद्द असलेला हा भाग विस्तीर्ण असल्याने पोलिसांच्या गस्तीवरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाणे अथवा चौकींची संख्या वाढविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

पाचगावच्या जगताप नगर परिसरात आठवड्यापूर्वी शिवलिंग खतखले या ज्येष्ठ नागरिकांना लुटून पुन्हा खंडणीची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरील संपूर्ण उपनगरीय भागात चिंतेचे सावट आहेत. खतखले दाम्पत्याला लुटल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे सातत्याने पैशाची मागणी केली जात होती. लुटीच्यावेळीच जर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असती तर पुढील घटना टळली असती, पण लांब पल्ल्यावरील पोलिस ठाण्यापर्यंत जायचे आणि तक्रार द्यायची ही मानसिकता अनेकांची नसते, हे वरील घटनेवरून स्पष्ट झाले आहे. यासाठी पोलिसांनीच सतर्क राहणेच योग्य ठरणार आहे. 

उपनगरीय भागात अनेक ठिकाणी विरळ वस्ती आहे. स्वतंत्र बंगले बांधून अनेकजण राहत आहेत. त्यामुळे चोरटे, दरोडेखोर, लुटारू आणि खंडणीबहाद्दरांना तेथे मोकळे रान मिळाल्याचे काही प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे. करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणारा हा परिसर प्रत्यक्ष पोलिस ठाण्यांपासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यास पोलिसांना कळवेपर्यंत आणि तेथे पोलिस पोहोचेपर्यंत बराचसा वेळ जात असल्याने गुन्हेगारांना तेच फायद्याचे ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.