Thu, Apr 25, 2019 06:07होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटविणार

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटविणार

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचा ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश असतानाही वाढीव बांधकामे होत आहेत. तरीही महापालिका अधिकारी झोपले आहे का? असा प्रश्‍न विचारून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. उपमहापौर अर्जुन माने यांनी कारवाई कधी करणार? त्याची तारीख द्या, असा आग्रह धरून कारवाईवेळी नगरसेवक उपस्थित राहतील, असे स्पष्ट केले. अखेर बुधवारपासून नोटिसा बजावून पुढील आठवड्यात अतिक्रमणावर हातोडा मारला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. 

परिवहन  सभापती  नियाज खान  म्हणाले, तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण  काढताना उच्च न्यायालयाने मे 2015 मध्ये ‘जैसे थे’  ठेवण्यास सांगून स्थगिती दिली आहे; परंतु त्यानंतर अनेकांनी न्यायालयाचा अवमान करून बांधकामे केल्याचे निदर्शनास आणून दिले. यामागचा सूत्रधार कोण? अशी विचारणा करून गरिबांची अतिक्रमणे उद्ध्वस्त करून धनदांडग्यांना अधिकारी मोठे करीत असल्याचा आरोप केला. नगररचना व विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला.

प्रा. जयंत पाटील यांनी न्यायालयाचा ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश असूनही बांधकामे होत असताना प्रशासनाने नेमके काय केले? ती बांधकामे पाडणार कधी? अशी विचारणा केली. भूपाल शेटे म्हणाले, कारवाईसाठी हद्दीचा वाद असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मग टीडीआर कसा दिला? असा प्रश्‍न विचारून खोत यांना धारेवर धरले. कारवाई होईपर्यंत टीडीआर देणे थांबविण्याची मागणी केली. सुरेखा शहा यांनी अधिकारी मिंधे असल्याने कारवाई करत नसल्याचा आरोप करून संबंधितांना न्यायालयात जायची संधी का दिली? असा प्रश्‍न विचारला. दरम्यान, कायदेशीर बाबी सांगण्यासाठी महापालिकेचे वकील तायडे सभागृहात आले होते; परंतु त्यांना पुरेशी माहिती नव्हती. अखेर महापौर फरास यांनी त्यांना तुम्हाला योग्य माहिती नसेल तर तसे सांगा; पण चुकीची माहिती देऊ नका, असे सुनावले. 

नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी संबंधितांना 31 डिसेंबर 2016 ला सात जणांना नोटिसा बजावल्याचे सांगितले. उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी अतिक्रमणाबाबत न्यायालयात दावा आहे. ‘जैसे थे’ आदेश असतानाही बांधकामे होत असल्याबद्दलही अवमान याचिका दाखल असून एकत्रित सुनावणी सुरू असल्याचे सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी बुधवारपासून नोटिसा बजावून पुढील आठवड्यात बांधकामे पाडू, अशी ग्वाही दिली. मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनीही चर्चेत भाग घेतला.