Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Kolhapur › कुतुहलातून लेखनाचा प्रवास 

कुतुहलातून लेखनाचा प्रवास 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : 

सतत नावीन्याचा शोध घेत असताना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचे कुतुहल निर्माण झाले. मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी लेखन करत गेला ते वाचकांना आवडत गेले अशा शब्दांत लेखक अच्युत गोडबोले यांनी आपल्या लेखन प्रवासाचे वर्णन विषद केले. ब्राम्हण सभा मंगलधाम व महालक्ष्मी बँक यांच्या वतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. 

 आपल्या लेखानाला सांस्कृतिक श्रीमंतीची किनार लाभली होती, असे सांगून गोडबोले म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची; पण शिक्षणाची आवड होती. त्यातूनच आयआयटी मध्ये गेलो. या काळात अनेक शास्त्र, अर्थ, संगणक या विषयातील तज्ज्ञांची भेट होत गेली. त्यांचे बौद्धिक ज्ञान पाहून आपल्याही ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्याचा निर्णय घेतला. यातूनच वाचन करत गेलो जे समजत नाही त्याला का? असा प्रश्‍न केला. त्याची उत्तरे शोधत गेलो. कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाऊन ज्ञान घेण्याची जिज्ञासा वाढत गेली. थोडक्यात मूलतत्त्वांचा अभ्यास करण्याची वृत्ती वाढत गेली. 

कोणतीही गोष्ट वाचकांना समजण्यासाठी ती सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला. संगणकावर अनेक पुस्तके आहेत; पण ती तांत्रिक दृष्ट्या समजण्यास सोपी नाहीत म्हणून संगणकावर सोप्या भाषेत पुस्तक   लिहिले त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात ही वाचन संस्कृती वद्धिंगत होण्याची गरज आहे. केवळ मुलांना गुण मिळवणारे मशीन तयार करू नका, असेही त्यांनी सांगितले. 
 यावेळी प्रकाश सांगलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीपक आंबर्डेकर यांनी परिचर करून दिला. सूत्रसंचालन दीपक भागवत यांनी तर आभार मेघा जोशी यांनी मानले.  यावेळी ब्राम्हण सभा मंगलधामचे उदय कुलकर्णी, अनुराधा तेंडुलकर, संतोष  कोडोलीकर, अ‍ॅड. विवेक  शुक्ल, अ‍ॅड. राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते.