Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Kolhapur › परीक्षा घ्या अन् पेपर तुम्हीच तपासा!

परीक्षा घ्या अन् पेपर तुम्हीच तपासा!

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:24AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या विविध अभ्यासक्रमांच्या मंजुरी आणि मुदतवाढीसाठी गुणांकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. तुम्हीच तुमची परीक्षा घ्या आणि पेपरही तुम्हीच तपासा, अशी ही पद्धत आहे. संबंधित महाविद्यालयानेच अभ्यासक्रमाबाबतची माहिती यापुढे विद्यापीठ समितीला लिहून द्यावयाची आहे. नव्या पद्धतीमुळे शिक्षण संस्थांना कसरत करावी लागणार आहे.

शिवाजी विद्यापीठाशी संलग्न अडीचशे महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांत मिळून सुमारे 3500 विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांना लाखो विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांची नेमकी वस्तुस्थिती दरवर्षी विद्यापीठाच्या नियुक्त समितीला तपासावी लागते. यापूर्वी समितीतील तज्ज्ञ मंडळी महाविद्यालयांवर जाऊन  माहिती घेऊन अहवाल तयार करत असत.  या अहवालानंतर संलग्नित महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढे सुरू करायचा की रद्द करण्याची शिफारस करायची हे ठरायचे. पण, आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. प्रत्येक कॉलेजनीच त्यांच्याकडे असणार्‍या अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करावयाचे आहे. यासाठी विद्यापीठाकडून विविध प्रश्‍नांचा फॉर्म दिला जाणार आहे. या फॉर्ममध्ये अभ्यासक्रमाची गरज, विद्यार्थी संख्या, स्टाफ, इमारत, विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, तंत्रज्ञान आदींची माहिती भरावयाची आहे. तसेच या माहितीचे  गुणसुद्धा संस्थेनेच द्यावयाचे आहेत.  संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेने ही माहिती भरल्यानंतर समिती या माहितीची फक्त शहानिशा करणार आहे. 

 एकप्रकारे शैक्षणिक संस्थांवर या नव्या पद्धतीच्या माध्यमातून विश्‍वास टाकण्यात आला आहे. कारण स्वत:चे मूल्यमापन स्वत:नेच केल्यासारखा हा विषय आहे. या प्रकारामुळे यापूर्वी समितीकडून होत असलेल्या मूल्यमापनाबद्दलच्या तक्रारी कमी होतील. तसेच पूर्वग्रहदूषितपणा किंवा मॅनेज करण्याचे प्रकारही बंद होतील. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विश्‍वासार्हता खर्‍या अर्थाने वाढण्यास मदत होईल.