Sat, Mar 23, 2019 18:23होमपेज › Kolhapur › साखरेचे मूल्यांकन 120 रुपयांनी घटले

साखरेचे मूल्यांकन 120 रुपयांनी घटले

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात आणखी 120 रुपयांची घट केली आहे. 15 दिवसांपूर्वी 110 रुपयांनी मूल्यांकन घटवले होते. अवघ्या 15 दिवसांत तब्बल 230 रुपयांनी मूल्यांकन घटल्याने साखर कारखानदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 

साखर कारखान्यांकडून उत्पादीत होणार्‍या साखरेवर उचल देण्यासाठी राज्य बँकेकडून मूल्यांकन केले जाते. गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा तब्बल 3450 रुपये इतके मूल्यांकन जाहीर केल्याने साखर कारखानदारांनी एफआरपीसोबतच 200 रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम एकरकमी पहिल्या उचलीच्या रूपाने देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे उसाची बिलेही जमा होऊ लागली आहेत. 

पण आता साखरेचे दर घसरणीस लागल्याने मूल्यांकनातही झपाट्याने घट होऊ लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी 110 रुपयांनी मूल्यांकन कमी केल्याने 3390 रुपये प्रति क्‍विंटल मिळाले त्यातही 15 टक्के कपात वजा जात ही रक्‍कम 2780 रुपये इतकीच झाली. आता पुन्हा 120 रुपये कपात झाल्याने ही रक्‍कम 3270 पर्यंत खाली आली आहे. आता या रकमेतून 2570 रुपये इतकेच कारखान्याच्या हातात येणार आहेत. पहिली उचल सरासरी 2900 ते 3100 रुपये असल्याने झालेल्या मूल्यांकनातून ठरल्याप्रमाणे पहिला हफ्ता शेतकर्‍यांना कसा द्यायचा असा प्रश्‍न कारखान्यांना पडला 
आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सातत्याने दरात घसरण होत असल्याने साखर कारखान्यांना दर देणे अवघड होऊन बसणार आहे. कारखाने पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत लोटले जाणार आहेत. आता ट्विटरवरून कारभार करणार्‍या केंद्रीयमंत्री रामविलास पास्वान यांच्याकडेच शेतकरी संघटना व कारखानदार यांनी एकत्रितपणे गार्‍हाणे मांडण्याची गरज आहे. साखरेचा बफर स्टॉक करण्याबरोबरच साखरसाठा नियंत्रण उठवण्याचा निर्णय घेण्याचा आग्रह धरण्याची गरज आहे. साखरेवरील आयात शुल्कही वाढवण्याची गरज आहे, हे उपाय केले नाहीत तर साखर उद्योग अडचणीत येणार आहे. शेतकर्‍यांना एफआरपी देणेही अडचणीचे ठरणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.