Tue, Oct 22, 2019 01:31होमपेज › Kolhapur › साखर साठ्यावरील नियंत्रण उठवले

साखर साठ्यावरील नियंत्रण उठवले

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:22AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

यंदाच्या हंगामात देशात गरजेइतके साखर उत्पादन होणार असल्याने व्यापारी आणि खाद्य उद्योगांवर असलेले साठा आणि उलाढालीवरील नियंत्रण शासनाने उठविले आहे. मंगळवारी (दि. 19) केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही तातडीने सुरू केली आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होणार असून, त्यामुळे कारखानदार आणि शेतकर्‍यांनाही फायदा होऊ शकतो.

देशात 2017/18 या हंगाम वर्षात 249 लाख टन साखर उत्पादन होणार असून, ते गरजेइतके असल्याने साखर व्यापारी आणि खाद्य उद्योगांवरील साठा व उलाढाल नियंत्रण उठविले असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशाला यंदा 250 लाख टन साखरेची गरज आहे. त्या प्रमाणात होणारे उत्पादन पुरेसे आहे. परिणामी, साखरेचे घाऊक विक्रेते, तसेच चॉकलेट, शीतपेयांसह ज्या-ज्या खाद्य उद्योगांना साखरेची गरज असते त्यांना यापुढे कितीही प्रमाणात साठा आणि उलाढाल करता येणार आहे. सध्या कोलकाता वगळता व्यापार्‍यांना पाच उद्योगांना पाच हजार क्विंटल इतकाच साठा करण्याची मर्यादा होती. 

कोलकाता येथे ही मर्यादा दहा हजार क्विंटलपर्यंत होती. कारण, तेथे साखर उत्पादन कमी आणि वाहतुकीलाही वेळ लागतो. अशा मर्यादेमुळे साखरेचा उठाव होण्यावरही खूपच मर्यादा आली होती.
व्यापारी आणि खाद्य उद्योगांवरील साखरसाठा, तसेच उलाढालीवरील मर्यादेचे नियंत्रण उठविल्याने भविष्यात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील जाणकारांचे मत आहे. व्यापारी आणि उद्योजकांवर साठा आणि उलाढाल याच्या मर्यादेचे नियंत्रण राहिल्याने साखरेचा उठाव कमी होत होता. आता नियंत्रण उठविल्याने साखरसाठा करण्यापासून वापरही वाढू शकतो. त्यामुळे बाजारात साखरेचे दर वाढू शकतील किंवा कमी तरी होणार नाहीत, असे गृहीत धरले जात आहे. त्याचा फायदा अर्थातच साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकर्‍यांनाही होईल.