Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Kolhapur › शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 07 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षीही महापालिकेच्या व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झेंडा फडकविला आहे. यात कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील 30 पेक्षा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. 

राज्य परीक्षा परिषदेकडून फेब्रुवारी 2018 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. जून महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम  निकाल जाहीर करण्यात आला. गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 6) दुपारी तीन वाजता पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 

महापालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित मनपा शाळांमधील 30 पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. मनपाच्या लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे सर्वाधिक 21 विद्यार्थी आहेत. जरगनगर विद्यामंदिरचा साईराज पाटील 272 गुण संपादन करीत शहरी विभागातून पाचवा, तर ओंकार बिक्कड आठवा व राजवर्धन फडतारे तेरावा आला आहे. जरगनगर विद्यामंदिरच्या जयराज माळी, जोतिरादित्य पाटील, महंमद शेख, मानसी वाळके, निहाल जाधव, प्राची गवळी, प्रथमेश भोसले, प्रयाणी पाटील, सलोनी पाटील, समीक्षा फाळके, समृद्धी जाधव, संध्या पाटील, सार्थक घाडगे, साईराज भोसले, स्वरा कोराणे, उत्कर्ष कांबळे, वरद कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

टेंबलाईवाडी शाळेतील गौतमी गायकवाड, मुकुंदराज धुमाळ, शर्वरी रोकडे, सृष्टी चव्हाण, ऋतुजा वळकुंजे यांचा समावेश आहे. भाऊसो जगदाळे विद्यालयाचा ओम देसाई शहरी विभागातून अकरावा आला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण, भाऊसो जगदाळे, नेहरूनगर व आहिल्याबाई सेंट्रल स्कूल, महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला आहे, अशी माहिती मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी दिली. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर नावे मंगळवारी (दि.7) परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहेत.