Wed, Apr 24, 2019 12:05होमपेज › Kolhapur › कोल्हापूरवर पडतोय अतिरिक्त ताण!

कोल्हापूरवर पडतोय अतिरिक्त ताण!

Published On: Dec 25 2017 9:06PM | Last Updated: Dec 25 2017 9:06PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सागर यादव 

कोल्हापूरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही गोष्ट इथल्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पोषक आहे. वाढत्या पर्यटकांमुळे  पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा वापरही वाढला आहे. त्याचबरोबर कचरा व ड्रेनजच्या निर्गतीची समस्याही वाढत आहे. त्याचा फटका शहरवासीयांसह पर्यटकांनाही बसत आहे. तरी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी पर्यटकांची वाढती संख्या आणि शहरातील मूलभूत सुविधा याबाबत योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोल्हापूरबद्दल जगभरातील पर्यटकांना आकर्षण आहे. यामुळे देशातील विविध राज्यांसह जगभरातून कोल्हापूरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढतच आहे.  पर्यटनवाढीमुळे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. ही गोष्ट स्थानिक लोकांसाठी पोषकच आहे. पर्यटनाशी संबंधित हॉटेलिंग, यात्री निवास, स्थानिक वैशिष्ट्ये असणार्‍या गूळ, चपला, कोल्हापुरी साज, तिखट-मसाले, फेटा यासह विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करणारे फेरीवाले आदींना याचा फायदा होणार आहे. ही बाब सकारात्मक आहेच; मात्र अनेक गोष्टी यामुळे प्रभावीतही होणार आहेत. यावर उपाययोजनेची गरज आहे. 

विजेच्या मागणीचा आलेखही चढाच...

पाण्याप्रमाणेच पर्यटकांकडून होणार्‍या विजेचा वापरही मोठा असल्याने विजेच्या मागणीचा आलेखही चढाच असणार आहे. फॅन, ए.सी. यासह लाईट्स, हीटर-गिझर, ईस्त्री अशा विविध कारणांसाठी वीज वापर होत आहे. पर्यटक भेट देणार्‍या ऐतिहासिक-धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असणार आहे. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी सुरक्षेसह आवश्यक इतर उपाययोजनांसाठी लागणारी वीज वेगळीच असणार आहे. याचाही विचार व्हावा. 

शहरात ये-जा करणार्‍या पर्यटकांमुळे पाण्याचा वापर  वाढला आहे. वास्तविक, प्रशासनाने स्थानिक लोकसंख्येचा विचार करून  पाणीपुरवठ्याचे नियोजन केलेले असते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे  पाण्याचा वापर वाढतो. सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ, उद्याने, यात्रीनिवास, धार्मिक स्थळे, मैदाने अशा ठिकाणांचाही वापर त्यांच्याकडून केला जातो. या ठिकाणी त्यांच्याकडून आंघोळीसह स्वच्छता कारणांसाठी पाण्याचा वापर केला जातोच. याचे मोजमाप करून त्यादृष्टीने भविष्यात पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

 कोल्हापूरचा पर्यटन विकास झपाट्याने होत आहे. पर्यटकांची संख्या वाढतच राहाणार आहे. याचा परिणाम साहजिकच विविध घटकांवर होणार आहे. याकरिता स्थानिक प्रशासनासह विविध विभागांनी समन्वयाने सज्ज राहणे गरजेचे आहे.  - अनिल चौगुले (कार्याध्यक्ष, निसर्गमित्र)