Sat, Feb 23, 2019 02:20होमपेज › Kolhapur › भरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले

भरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 1:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलसमोरून सोमवारी दुपारी सुरक्षारक्षकाच्या हातातील 7 लाख 31 हजार रुपये असलेली बॅग अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसडा मारून लंपास केली. दशरथ धनाजी माने (रा. गणेशवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

माने ब्रिंग्ज इंडिया कंपनीकडे नोकरीस आहेत. कापड दुकानांकडील रक्‍कम एकत्रित करून ती बँकेत भरण्याचे काम त्यांच्याकडे असते. सोमवारी सकाळी दुकानांतून पैसे एकत्रित करून ते सुभाष रोडवर आले. त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक बाळू माने होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन इसम त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या इसमाने माने यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावली. माने यांनी आरडाओरडा केला; पण चोरटे भरधाव वेगाने उमा टॉकीजच्या दिशेने निघून गेले.

सिग्‍नलजवळ असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण चोरटे गोखले कॉलेज चौकातून पसार झाले. सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीचा नंबर मिळाला आहे; नंबर अस्पष्ट असल्याने त्याच नंबरशी संलग्‍न दुचाकी मालकांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांसमोर आव्हान
चार दिवसांपूर्वी परीख पुलाजवळ मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी सात लाख रुपयांची रोकड लंपास केली. वाढत्या जबरी चोर्‍यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.