Fri, Nov 16, 2018 10:52होमपेज › Kolhapur › जादा वेळेत दोन गोल्स करून हिरावला विजय 

जादा वेळेत दोन गोल्स करून हिरावला विजय 

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:05AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने मिळविलेली एकमेव गोलची आघाडी सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच जादावेळेत कमी करण्याबरोबरच पाठोपाठ दुसरा गोल नोंदवून त्यांचा 2-1 असा धक्‍कादायक पराभव करून  संध्यामठ तरुण मंडळाने केला. जादा वेळेत सलग दोन गोल्स नोंदवून संध्यामठच्या सतीश अहिर याने सामन्याचा निकाल बदलला. 

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारचा सामना संध्यामठ विरुद्ध फुलेवाडी यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला.  फुलेवाडीकडून रोहित मंडलिक, सूरज शिंगटे, शुभम साळोखे, सिद्धेश यादव, संकेत साळोखे, अक्षय मंडलिक यांनी गोलसाठी चढायांचा अवलंब केला. 16 मिनिटाला झालेल्या जोरदार चढाईत संकेत साळोखे याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. 

सतीश अहिरचे सलग दोन गोल्स

संध्यामठकडून सतीश अहिर, अक्षय पाटील, शाहू भोईटे, आशिष पाटील, सिद्धार्थ कुर्‍हाडे, रोहित पौंडकर, ओंकार पावसकर, अजिंक्य गुजर यांचे गोल फेडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. सामन्याचा उत्तरार्धाची वेळ संपली. चौथ्या पंचांनी जादा वेळ दाखविली. यामुळे सामना फुलेवाडीने एकमेव गोलने जिंकला असे म्हणत अनेक फुटबॉलप्रेमींनी मैदान सोडले होते. संध्यामठने झुंज अखंड ठेवली होती. बेसावध असणार्‍या फुलेवाडीच्या खेळाडूंना चकवा देत 81 व्या मिनिटाला संध्यामठच्या सतीश अहिरने गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसर्‍या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 83 व्या मिनिटाला वैयक्‍तिक व संघाकडून दुसरा गोल नोंदवत 2-1 असा विजय मिळवून दिला.