Wed, Apr 24, 2019 00:20होमपेज › Kolhapur › देशातील शांततेसाठी चर्चमध्ये विशेष प्रार्थना

देशातील शांततेसाठी चर्चमध्ये विशेष प्रार्थना

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:49PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी.

जगभरात आनंद आणि उत्साह घेवून येणारा ‘नाताळ’ सण आज शहरात उत्साहात साजरा झाला. प्रार्थना, उपासना, गीतगायन यामुळे शहरातील विविध चर्चसह अनेक ठिकाणी नाताळचा आनंद व्दिगुणीत झाला होता. वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर चर्च, ऑल सेंट्स चर्च, सेंट झेवियर्स चर्च, ब्रम्हपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदीर, सेवंथ डे चर्च, न्यू लाईफ चर्च , आदी चर्चमध्ये देशातील एकता, शांतता टिकुन रहावी याकरिता विशेष प्रार्थना करण्यात आली.

कोल्हापुरात ख्रिस्ती बांधवासह इतर धर्मीयही मोठ्या उत्साहात नाताळ साजरा करतात. आठ दिवस आधीपासून शहरात नाताळ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन के ले जाते. प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयीचे देखावे, लघू नाटिका चर्चमधील आयोजित कार्यक्रमांतर्गत सादर करण्यात आले होते. तसेच चर्च परिसरात ‘गव्हाणातील प्रभू येशु ख्रिस्ताचा  जन्म ’ देखावा तयार करण्यात आला आहे.
न्यू शाहुपूरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च सह शहरातील लहान मोठ्या चर्चही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले होते.मागील दोन दिवसांपासून कॅरल सिंगीग गु्रपनी नाताळची गाणी गाऊन रात्री जागवल्या. ख्रिस्ती घरामध्ये जावून येशूचा जीवनपट सांताक्लॉजच्या साथीने नाताळच्या गाण्यातून त्यांनी उलगडला. मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले.
...................
वायल्डर मेमोरियल चर्चसह इतर चर्चमध्येही शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. देशाचा राज्यकारभार सुलभरित्या करता यावा याकरिता परमेश्‍वराने त्यांना ताकद द्यावी यासाठी विशेष प्रार्थना रेव्ह. जगन्नाथ हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . यावेळी अनिल जाधव यांनी संदेश दिला. 
..........................
चर्चबाहेर यात्रेचे स्वरूप 
वायल्डर मेमोरियल चर्चबाहेरील परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. लहान मुलांची खेळणी, इमिटेशन ज्वेलरी आदींच्या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यात्रेतील पाळणे, झोपाळे तसेच छोेटा भिम ,डोरेमॉनच्या आकारातील फुग्यांनी बालचमूंना आकर्षित केले. याशिवाय आईस्क्रिमसह इतर खाद्यपदार्थांच्या स्टॉलची रेलचेल पहायला मिळाली. 
......................................
तरूणाई सेल्फीत मग्न.
नाताळनिमित्त चर्चमध्ये प्रसन्न वातावरण निर्मिती होती. प्रत्येकजण एकमेकांची गळाभेट घेत मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा देत होते. तर तरूणी सांताक्लॉजची टोपी घालून सेल्फी घेण्यात मग्न होते. या उत्सवातील आनंदाचे क्षण टिपत कायमस्वरूपी या आठवणी साठवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसले. तसेच ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन , शुभेच्छा पत्रांची आदान - प्रदान करत उत्साहात नाताळ साजरा केला.