Mon, Aug 19, 2019 05:56होमपेज › Kolhapur › पूल रखडण्यास जबाबदार असणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पूल रखडण्यास जबाबदार असणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर झालेल्या अपघातात तेराजण ठार झाले आहेत. पर्यायी पुलाचे काम रखडल्याने हे रखडण्यास जबाबदार असणार्‍या जिल्हाधिकारी, इतर अधिकार्‍यांसह तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या कार्यालयात सुमारे दीड तास ठिय्या मारला.  करवीर पोलिस उपअधीक्षक सात दिवसांत या प्रकरणाची चौकशी करतील त्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्‍वासन दिल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. 

शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानंतर कोल्हापूर जिल्हा सर्व पक्षीय नागरी कृती समितीने पोलिस अधीक्षक मोहिते यांची भेट घेतली.  निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, या पुलाचे काम पूर्ण करावे यासाठी कृती समितीने वारंवार आंदोलने केली. प्रत्येक अधिकारी माझ्याकडे नाही, असा सूर आळवत आहे. यामुळे या अपघातास लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, पुरातत्त्व विभागचे अधिकारी, तथाकथित पर्यावरणवादी उदय गायकवाड या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.  

अ‍ॅड. महादेवराव अडगुळे म्हणाले,  पुलाला 140 वर्षे झाल्याने कठडे आणि एकूणच पूल कमकुवत बनला आहे. पर्यायी पुलास तथाकथित पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. मात्र, हे पर्यावरणवादी पुलाचे 80 टक्के काम होईपर्यंत गप्प  का होते? त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. 

संजय पवार म्हणाले, अधिकार्‍यांना कामापेक्षा पैशात जास्त रस असतो. निविदा काढण्यापूर्वी सर्व खात्याच्या ना हरकत का घेतल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी ही घटना गंभीरपणे घेतली पाहिजे.  चंद्रकांत यादव म्हणाले, अधिकार्‍यांनी चालढकल केली एवढेच नाही तर जिल्हाधिकार्‍यांनीही गंभीरपणे घेतले नाही. त्यामुळेच  पुलाचे काम  रखडले. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, अपघाताची जबाबदारी निश्‍चित करून सर्वांवर गुन्हे दाखल करावेत. किशोर घाटगे म्हणाले, चालकावर जबाबदारी ढकलून सरकार आणि प्रशासनाने मोकळे होऊ नये. अशोक पोवार म्हणाले, चार वर्षे आंदोलन सुरू आहे. तरीही प्रशासन प्रतिसाद देत नाही.  त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांसह विद्यमान जिल्हाधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करावा. 

अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, कठडा चांगला असता तर गाडी नदीत पडलीच नसती. याचा अर्थ पूल कमकुवत आहे. पुलाचे आयुष्यमान संपल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सहा जून 2015 च्या पत्राने कळविले आहे. मग अशा पुलावरून वाहतूक सुरू कशी? त्यामुळेच या सर्वांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राजू लाटकर म्हणाले, आंदोलकांना पोलिसांच्या तोंडाला लावले जाते. अधिकार्‍यांची खाबुगिरी आहे. आंदोलकांना भिकारी आणि गुन्हेगार समजण्यात येते. त्यामुळे अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा.   बाबा पार्टे म्हणाले,  सार्वजनि  बांधकाम  विभागाचे अधिकारी संपत आबदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारवाई करावी.  पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले, घटना गंभीर आहे. या घटनेने मलाही वेदना झाल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचा वेग अत्यंत कमी होता. 70 मीटरचे अंतर 11 सेकंदात पार केले आहे. केवळ गाडीच्या धक्क्याने कठडा कोसळला म्हणजे पूल कमकुवत आहे. त्यामुळे पूल वाहतुकीस योग्य नाही, असे जाहीर करूया. आता एकमेकांची उणेदुणे काढण्यापेक्षा यातून काहीतरी मार्ग काढूया. इंजिनिअर, डॉक्टर्स यांच्यावर थेट गुन्हा दाखल करता येत नाही.त्यामुळे सात दिवसांची मुदत द्या. पुढील कारवाई करतो, अशी विनंती शिष्टमंडळास केली. अखेर निवेदन हाच तक्रार अर्ज समजून हा अर्ज करवीर उपअधीक्षकांकडे पाठवून  सात दिवसांत अहवाल घेऊ न पुढील कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.  

यावेळी रवी चौगुले, अ‍ॅड. प्रकाश मोरे, दिलीप पवार, बाबुराव कदम, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, कादर मलबारी, प्रसाद जाधव, मोहम्मदशरीफ शेख यांनी मते व्यक्‍त केली. बैठकीस विक्रम जरग, किसन कल्याणकर, अनिल कदम, दुर्गेस लिंग्रस, शिवाजी जाधव, सुरेश जरग, अजित सासने, रमेश मोरे, महादेव पाटील, अशोक भंडारे, श्रीकांत भोसले, सुजित चव्हाण, गिरीष फोंडे, चंद्रकांत बराले, जहिदा मुजावर, सुनीता राऊत व कार्यकर्ते उपस्थित 
होते. 

यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

जिल्हाधिकारी, महापालिकेचे तत्कालीन आयुक्‍त, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अधीक्षक डायरेक्टर ऑफ आर्किओलॉजी आणि उदय गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. हे निवेदनच तक्रारअर्ज समजून कारवाईची मागणी केली.  यावेळी अतिरिक्‍त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे उपस्थित होते. 

दिलीप देसाईंचे नाव का नाही 
आंदोलकांनी गुन्हा दाखल करण्याच्या यादीत उदय गायकवाड यांचे नाव घेतले. सर्व अधिकार्‍यांची कार्यकर्त्यांची नावे पाहिल्यानंतर पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिलीप देसाई यांचे नाव का नाही, असा सवाल केला. 

सभागृहात अपघाताचा थरार
शुक्रवारी रात्री घडलेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखविण्यात आले. 11 वाजून 34 मिनिटे आणि 19 सेकंदापासून या थरारास सुरुवात झाली आणि 11 वाजून 35 मिनिटांनी अपघात घडला. अवघ्या 41 सेकंदाचा थरार या कॅमेर्‍यात कैद झाला होता. अपघातग्रस्त वाहन नदीत कोसळताना पाहून अनेकांनी हळहळ व्यक्‍त केली.