Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावरून एस.टी. आणि के.एम.टी. बसेस आजपासून सुरू

शिवाजी पुलावरून एस.टी. आणि के.एम.टी. बसेस आजपासून सुरू

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील शिवाजी पुलावरून एस. टी. आणि के.एम.टी. बसेस गुरुवारी (दि. 22) सकाळपासून सुरू होणार आहेत. ट्रकसह अवजड वाहतूक वगळता एस. टी. आणि के.एम.टी. बसेससह मोटारकार, दुचाकीची वाहतूक आता शिवाजी पुलावरून सुरू राहणार आहे. ही वाहतूक पुलावरून अत्यंत कमी वेगाने सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग शाखेने बुधवारी जिल्हा पोलिसप्रमुखांना दिले. त्यानुसार एस.टी. आणि के.एम.टी. बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्याच महिन्यात 26 जानेवारीच्या मध्यरात्री शिवाजी पुलावरून ट्रॅव्हलर बस पंचगंगेत कोसळून तेरा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पूल कमकुवत झाला असल्याच्या शक्यतेने पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलनही  केले. त्यामुळे पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती; पण पुलाच्या पलीकडील गावातून त्यास विरोध होऊ लागला. करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातून कोल्हापूरला येणार्‍यांची गैरसोय होऊ लागली. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार आणि दूध व भाजीपाला विक्रीसाठी कोल्हापुरात येणार्‍या शेतकर्‍यांचीही गैरसोय झाली. त्यामुळे पूल वाहतुकीस खुला करण्याबाबत दबाव वाढू लागला. त्यामुळे प्रशासनाकडून मोटार कारसह लहान आणि दुचाकी वाहनांना वाहतुकीस पूल खुला करण्यात आला होता.

एस.टी. आणि के.एम.टी. च्या बसेससह सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पुलावरून जाण्यास बंदी होती. परिणामी पन्हाळा, जोतिबा, मलकापूर, रत्नागिरीकडून येणार्‍या जाणार्‍या सर्व बसेस वाठार-वारणानगरमार्गे धावत होत्या. हे अंतर सुमारे 40 किलोमीटरने वाढल्याने प्रवाशांना जादा तिकिटाचा भुर्दंड पडण्याबरोबरच पाऊण तासापेक्षा अधिक वेळही लागत होता. या कारणाने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्‍त होऊ लागला. प्रवासी आणि करवीर, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांनी याबाबत आमदार चंद्रदीप नरके व माजी मंत्री विनय कोरे यांच्याशी संपर्क साधून एस.टी. व के.एम.टी. बसची सेवा सुरू करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. नरके आणि कोरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांना निवेदने देऊन चर्चा केली.

सध्या दहावी आणि बारावी परीक्षा सुरू आहेत. करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातून कोल्हापूरला परीक्षा देण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून एस.टी. व के.एम.टी. बस बंद असल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करण्याबरोबरच वेळेचाही प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एस.टी. व के.एम.टी बस सुरू करण्याबाबत दबाव वाढू लागला. आ. नरके यांनी जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेट घेतली, तर कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गतीने चक्रे फिरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग शाखेच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या. उपअभियंता गुळवणी यांनी यासंदर्भात नुकत्याच झालेल्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा आधार घेत अवजड वाहने वगळता वाहतूक सुुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र वरिष्ठांना दिले. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी बुधवारी सायंकाळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याकडे तसे पत्र सोपविले. धुमाळ यांनी एस.टी. व के.एम.टी. च्या अधिकार्‍यांशी चर्चा करून गुरुवारपासून बसेस सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.