Tue, Apr 23, 2019 22:01होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावर मंगळवारी ताकदीने आंदोलन

शिवाजी पुलावर मंगळवारी ताकदीने आंदोलन

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाबाबत मंगळवारी (दि.22) ताकतीने आंदोलन करण्याचा निर्धार शनिवारी सर्व पक्षीय कृती समितीने बैठकीत केला. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल, त्याकरिता नागरिकांत जनजागृती करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. अधिकार्‍यांना वेठीस का धरता, दिल्लीत जाऊन आंदोलन करा, असे वक्‍तव्य केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा बैठकीत निषेध करण्यात आला. 

आम्ही रिकामटेकडे नाहीत, कोणाच्या सुपार्‍याही घेतलेल्या नाहीत केवळ जनतेसाठी गेली तीन वर्षे हे आंदोलन करत आहोत, एकेकाळी आपणही आंदोलक होता, आता सत्तेत गेल्यानंतर भाषा बदलली काय, असा सवाल करत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची संधी आहे, त्याबाबत पुढाकार घ्यावा आणि पालकाची भूमिका निभवा, असा टोलाही पालकमंत्र्यांना बैठकीत लगावण्यात आला.

पर्यायी पुलाबाबत ‘वर्क ऑर्डर’ काढण्यात आली. मात्र, पावसाळ्यात काम करणे तांत्रिकद‍ृष्ट्या शक्य नसल्याने पुलाचे काम रेंगाळणार हे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. याबाबत आज महाराणा प्रताप चौकात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्याचे माहीत असूनही ‘वर्क ऑर्डर’ काढण्यात आली. ही फसवणूक आहे. यामुळे काहीही झाले तरी आता आंदोलन थांबणार नाही. यामध्ये कोणी मध्यस्थी करणार असेल तर त्यांनी प्रथम काम सुरू करावे. पालकमंत्र्यांनी पुलासाठी ताकद लावायला हवी होती.

बाबा पार्टे म्हणाले, 15 दिवसांत काम सुरू होईल असे जिल्हाधिकार्‍यांनीच सांगितले होते, त्यात आंदोलनकर्त्यांची काय चूक? काम सुरू होत नाही ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यावर जनतेसमोर येण्याऐवजी अधिकारी रजेवर कसे जातात? कुठे आंदोलन करायचे याबाबत आम्ही समर्थ आहोत. दिल्लीत आंदोलन होणार असेल तर ते देशव्यापी होईल, त्यामुळे आंदोलनाचीच उंची वाढणार आहे. 
सतीशचंद्र कांबळे म्हणाले, पालकमंत्र्यांनी आंदोलनाची कुचेष्टा केली. संभाजी जगदाळे म्हणाले, पुलाचे काम मार्गी लावणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. 

दिलीप पवार म्हणाले, आंदोलनाची चेष्टा करता, पण कोल्हापुरात चळवळीखेरीज काही मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच या पुलाचे काम होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे. जयकुमार शिंदे म्हणाले, टोलसारखे जनतेने या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. अशोक भंडारे म्हणाले, आंदोलनाला येत असलेल्या यशाला खोडा घालण्याचा हा प्रयत्न आहे. लाला गायकवाड म्हणाले, आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे

किशोर घाटगे म्हणाले, आंदोलनाला यश येत असताना ज्यांनी यापूर्वी स्वत:च्या अभिनंदनाचे फलक लावले, अशांच्या पोटात दुखत असेल म्हणून ही कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असावा. पालकमंत्री हे देखील स्वत: आंदोलक होते. त्यांना आंदोलनामुळेच सत्ता मिळाली आहे, सत्तेत गेल्यानंतर आंदोलनाबाबत त्यांची भाषा कशी काय बदलली जाते? अशोक पवार म्हणाले, आंदोलन करणारे रिकामटेकडे आहेत का? गेली तीन वर्षे हे आंदोलन सुरू आहे ते केवळ जनतेसाठी. विमानाची तिकिटे तुम्ही काढून देण्याइतके आम्ही फाटके आहोत का? प्रत्येक ठिकाणी दडपशाही होणार असेल तर असे पालकमंत्री बदलले पाहिजेत, असेही पवार म्हणाले. भगवान काटे म्हणाले, आंदोलकाबरोबर राज्यकर्त्यांनी यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. गणी आजरेकर म्हणाले, आंदोलनाची सर्व स्तरातून तीव्रता वाढवायला पाहिजे.चंद्रकांत बराले म्हणाले, पालकमंत्र्यांनी जनतेच्या हिताची भूमिका घ्यावी. अजित सासणे म्हणाले, हा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे, त्याला यश येणारच. तानाजी पाटील म्हणाले, आम्ही चुकतो असे वाटत असेल तर तुम्ही पुढाकार घ्या आणि हा प्रश्‍न सोडवा. बैठकीला रमेश मोरे, दिलीप माने, अनिल कदम, जयदीप शेळके, फिरोजखान उस्ताद, श्रीकांत भोसले, महादेव पाटील, सुनील देसाई, 
प्रा. मधुकर पाटील, किसन कल्याणकर, सुनील बिरजे आदी उपस्थित होते.