Thu, Apr 18, 2019 16:39होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल; प्रशासकीय हालचालींना वेग

पर्यायी पूल; प्रशासकीय हालचालींना वेग

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 09 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत जिल्हा आणि राज्य पातळीवरील प्रशासकीय हालचालींना मंगळवारी वेग आला. राज्याच्या विधी व न्याय, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत या पुलाच्या उर्वरित बांधकामाच्या परवानगीबाबत चर्चा झाली. याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्याचे समजते.

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे 80 टक्के बांधकाम झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कायद्याचा अडसर निर्माण झाला. यामुळे पुलाचे बांधकाम गेली अनेक महिने बंद आहे. पुलाचे काम सुरू व्हावे, याकरिता पुरातत्त्वच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. लोकसभेत तसे विधेयकही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक राज्यसभेत अद्याप मंजूर झालेले नाही. यामुळे या पुलाचे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करता येते, कायमस्वरूपी पुलाच्या बांधकामाबाबत तरतूद नसल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यावर कृती समितीने चार दिवसांत याबाबत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती आहे. याचबरोबर पावसाळा तोंडावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत या पुलावरील वाहतूक बंद केल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. वाहतुकीचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.

पावसाळ्यापूर्वी पर्यायी पुलाचे बांधकाम झाले नाही, तर ऐन पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यायी पुलाबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य पातळीवर विविध विभागांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क सुरू करत पत्रव्यवहारही केले जात आहेत. 

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी याबाबत विधी व न्याय विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत या पुलाच्या बांधकामाचा प्रश्‍न सोडवण्याबाबत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याबाबतही अधिकार्‍यांना सूचना देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रात्री उशिरापर्यंत तो होऊ शकला नाही. दरम्यान, आज दिवसभर जिल्हा व राज्य पातळीवर सुरू झालेल्या प्रशासकीय हालचालींमुळे पर्यायी पुलाबाबत लवकरच मार्ग निघण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.

 

Tags : kolhapur shivaji brig,  administrative