Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Kolhapur › शिवसेनेचा सीपीआरवर मोर्चा 

शिवसेनेचा सीपीआरवर मोर्चा 

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्याने सीपीआरमधील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे, असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सीपीआरवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीवर चढविले. 

येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी, मेडिसीन, ए.एन.टी, त्वचा रोग, रिडियालॉजी, औषध शास्त्र, बालरोग आदी विभागांतील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे महिन्याभरापासून सीपीआरमधील वैद्यकीय सेवा कोलमडू लागली आहे. काही चुतुर्थश्रेणी कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर यांची येथे मनमानी वाढली आहे. याचा विपरित परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. सात दिवसांत सीपीआरमधील समस्यांची परिपूर्ण माहिती द्या, अधिवेशनात आवाज उठवू, असे आ. क्षीरसागर यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना सांगितले. 

आ. क्षीरसागर म्हणाले, दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सीपीआरला गतवैभव प्राप्त करून दिल्याने रुग्णालयाच्या लौकिकात भर पडली आहे. मध्यंतरी विविध कारणांमुळे रुग्णालय डबघाईला आले होते. साडेतीन ते चार वर्षांपासून आम्ही लोकप्रतिनिधींनी शासकीय पातळीवर निधी आणि तज्ज्ञ डॉक्टर येथे आणले. त्यामुळे रुग्णालयाची डागाळलेली प्रतिमा सुधारली.

कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय दवाखान्यांतील डॉक्टर खासगी व्यवसाय करत आहेत. मग कोल्हापूरला वेगळा नियम का,  असा प्रश्‍न देखील आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला. बोगस पदवी घेऊन अनेक रुग्णांचा जीवन घेणारा न्युरो सर्जन डॉक्टर कौस्तुभ वाईक याच्यावर कारवाईला इतका उशीर का? त्याच्यावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी केली. 

यावेळी युवा सेनेचे पियुष चव्हाण, जयवंत हारूगले, विश्‍वजित साळोखे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे, पद्माकर कापसे, अजित गायकवाड, पूजा भोर, मंगल साळोखे आदी उपस्थित होते.