Wed, Sep 26, 2018 18:09होमपेज › Kolhapur › शाहूकालीन  दिवा पुन्हा प्रकाशमान 

शाहूकालीन  दिवा पुन्हा प्रकाशमान 

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:44PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पूनम देशमुख .

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्व क्षेत्रातील कार्य अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेसह साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली. आजही त्यांच्या कार्याची महती सांगणार्‍या अनेक वास्तू पहायला मिळतात, किंबहुना या वास्तूच प्रेरणा देतात. अशीच एक वस्तू पंचगंगा नदीकाठी स्मशानभूमीत आहे. स्मशानभूमीत रात्री अपरात्री कधीही लोकांना यावे लागले तर त्यांच्यासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराज यांनी दिवाबत्तीची सोय केली आहे. काळाच्या ओघात हा दिवा बंद पडला होता. गतवर्षी शतकपूर्ती साजरा केलेल्या या दिव्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी मारवाडी समाजाने उचलली आणि शाहूकालीन हा दिवा पुन्हा प्रकाशमान झाला.

राजर्षी शाहुं महाराजांनी 1916 साली बसवलेला दिवा आजही सुस्थितीत आहे. नागरिकांना दहनविधीसाठी स्मशानभूमीकडे पंचगंगा नदीमार्गावरून रात्री अपरात्री येणे अडथळयांचे ठरत होते. ही समस्या लक्षात घेत शाहू महाराजांनी हा दिवा पंचगंगा नदीकाठी बसवला होता. कालांतराने हा दिवा आता पंचगंगा स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आला आहे.

या दिव्याचे वैशिष्टये म्हणजे अगदी एक किलोमीटरपेक्षाही अधिक अंतरापर्यत त्याचा प्रकाश पडतो. याशिवाय तो हव्या त्या दिशेला वळवता येतो. अमेरिका येथील जनरल इलेक्ट्रीकल्स कंपनीचा हा दिवा (प्रोजेक्टर) 29 ऑगस्ट 1916 रोजी बसवण्यात आला होता. काही वर्षापूर्वी हा दिवा बंद पडला, त्यावेळी राजस्थानी श्‍वेतांबर जैन मारवाडी समाज अंतिम सेवा संस्थेच्या सहकार्यातून मुंबई येथून कारागीर बोलवून या दिव्याची दुरूस्ती केली. मागील वर्षी या दिव्याच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 24 सप्टेंबर 2016 रोजी हा दिवा पुन्हा प्रकाशमय करण्यात आला.