होमपेज › Kolhapur › शाहू जन्मस्थळ संग्रहालयाच्या कामासाठी दुसरा ठेकेदार मिळेना?

शाहू जन्मस्थळ संग्रहालयाच्या कामासाठी दुसरा ठेकेदार मिळेना?

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:00AMकसबा बावडा : प्रतिनिधी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांंच्या जन्मस्थळाचे काम विशेष अधिकार वापरून पुरातत्त्व विभागामार्फत करावे, अशी लेखी मागणी उपसमितीने राज्य शासनाकडे केली होती, ती धुडकावण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या काळात ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी झालेला ठेकेदार आता पुन्हा जन्मस्थळातील संग्रहालयाचे काम करणार असल्याचे समजते.

जन्मस्थळ वास्तू 1977 साली राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली. शाहू जन्मस्थळाच्या जतन व विकासकामासाठी आघाडी सरकारच्या काळात 6 कोटी 57 लाखांचा निधी खर्च झाला. स्मारकाच्या अंतिम टप्प्यात शाहू जन्मस्थळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांंच्या जीवनावर आधारित वस्तुसंग्रहालय उभारण्याचे निश्‍चित झाले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीने 13 कोटी 56 लाखांचा आराखडा तयार केला. पुढे या कामाचे टप्पे करण्यात आले.

संग्रहालयाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करावे, असा ठराव करून तो उपसमितीने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा शासनाला पाठवला. 2002 च्या शासन निर्णयानुसार काम ठेकेदारामार्फत होईल, असे शासनाने उपसमितीला कळविले. फेब्रुवारी 2018 ते 15 मे 2018 दरम्यान पुन्हा खुली ई-निविदा मागवण्यात आली. शाहू जन्मस्थळ संग्रहालयाच्या कामासाठी पाच निविदा भरल्या. यापैकी 2 अपात्र ठरल्या. उर्वरितमधील एक संग्रहालय कामाचा अनुभव नसणारा असल्याने ई-निविदा रद्द करून संग्रहालयाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करावे, असा ठराव उपसमितीने पुन्हा करून तो 1 जून 2018 रोजी शासनास पाठवला.

ई-निविदा रद्द करून संग्रहालयाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करावे, असा ठराव पाठवून एकीकडे उपसमिती ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्‍ती केली होती. असे असताना पुरातत्त्व विभाग ई-निविदेद्वारे काम करून घेण्याच्या तयारीत आहे. जन्मस्थळामधील संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा मंजूर असून, त्यासाठीचा सुमारे दोन कोटींहून अधिकचा निधी पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाला आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा राज्य शासनाने संग्रहालयाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करावे, ही उपसमितीची मागणी फेटाळली, तसे शासनाचे पत्र समितीला प्राप्‍त झाले आहे. पात्र ठेकेदारापैकी आघाडी सरकारच्या काळात ब्लॅकलिस्ट करण्याची जोरदार मागणी झालेला ठेकेदार आता पुन्हा जन्मस्थळातील संग्रहालयाचे काम करणार असल्याचे समजते.