Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Kolhapur › संयुक्त जुना बुधवार, ‘पीटीएम’ची विजयी सलामी

संयुक्त जुना बुधवार, ‘पीटीएम’ची विजयी सलामी

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:02AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा एकमेव गोलने पराभव करून संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने तर संध्यामठ तरुण मंडळाचा 5-0 असा धुव्वा उडवत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. अबालवृद्ध फुटबॉलशौकिनांच्या उत्साही उपस्थितीत मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर सन 2017-18 च्या फुटबॉल हंगामास दिमाखात प्रारंभ झाला. 

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए’ लिग वरिष्ठ गट फुटबॉल साखळी स्पर्धेचे उद्घाटन केएसएचे चिफपेट्रन शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, संभाजीराव पाटील-मांगोरे, विश्‍वास कांबळे, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, मनोज जाधव, संजय पोरे आदींसह वरिष्ठ संघांचे प्रतिनिधी, केएसए व सॉकर रेफ्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सामन्यांचे समालोचन विजय साळोखे यांनी केले. 

महेश पाटीलचा विजयी गोल...

दुपारच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यात सामना झाला. चुरशीच्या सामन्यात जुना बुधवारने एकमेव गोलने विजय मिळवून 3 गुणांसह आघाडी मिळविली. सामन्याच्या 6 व्या मिनिटाला महेश पाटीलने गोल केला. यानंतर त्यांच्या निखिल कुलकर्णी, नीलेश सावेकर, अखिल पाटील, प्रसाद पाटील यांनी आघाडीत भर घालण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. दिलबहारकडून स्वप्निल भोसले, मसुद मुल्ला, शुभम सरनाईक, ओंकार शिंदे, रोहित जाधव, तुषार देसाई यांनी गोल फेडण्यासाठी लागोपाठ चढाया केल्या. मात्र, फिनिशिंग आणि ‘बॅडलक’ अभावी शेवटपर्यंत गोलची परतफेड होऊ शकली नाही. अखेर सामना जुना बुधवारने 1-0 असा जिंकला. 

पाटाकडीलचा मोठा विजय...

सायंकाळी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. प्रारंभीपासूनच सामन्यावर पूर्णपणे पीटीएमचे वर्चस्व होते. ऋषीकेश मेथे-पाटील,  ऋषभ ढेरे, ओंकार जाधव, डेव्हीड कार्लोस यांनी आघाडीसाठी योजनाबद्ध चढाया सुरू ठेवल्या. 11 व्या मिनिटाला ओंकार जाधवने पहिल्या गोलची नोंद केली. 20 व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे-पाटीलने दुसरा गोल करून मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धातही हा आक्रमक पवित्रा कायम होता. 63 व्या मिनिटाला अ‍ॅबीओ अकिम याने तिसरा गोल मारून आघाडी भक्कम केली. पाठोपाठ ऋषभ ढेरे याने 68 व्या मिनिटाला संघाकडून चौथा गोल केला. 70 व्या मिनिटाला डेव्हीडने गोल करत आघाडी 5-0 अशी भक्कम केली. संध्यामठकडून मोहित मंडलिक, आशिष पाटील, सौरभ हारुगले, सतीश अहिर, सिध्दार्थ कुर्‍हाडे यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न पीटीएमच्या भक्कम बचावफळीने फोल ठरविले. यामुळे एकाही गोलची परतफेड झाली नाही.