Fri, Nov 24, 2017 20:20होमपेज › Kolhapur › सोशल मीडिया म्हणतोय,‘साहेब मारा...पण जाळू नका’

सांगली पोलिसांच्या कारनाम्यांचा पंचनामा सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : गौरव डोंगरे

ट्रॅफिक पोलिस एका दुचाकीस्वाराला पकडतो... लायसन्सची मागणी... पोलिसांचे दरडावणे सुरूच... यावर दुचाकीस्वार म्हणतो, साहेब डब्बल पावती करतो, मार खातो, पण प्लीज मला जाळू नका. सांगली पोलिसांच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावरून असा उपरोधिक पंचनामा सुरू आहे. पोलिसांच्या मुर्दाडपणाचे धिंडवडे काढले जात आहेत. तर पोलिसांच्या चांगुलपणाची प्रशंसासुद्धा केली जात आहे. 

सांगली शहर पोलिस ठाण्यात चोरीच्या संशयावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यासारखा घृणास्पद  प्रकार पोलिसांकडून करण्यात आला. या कृतीने पोलिस दलाची मान शरमेने खाली जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. सोशल मीडियावर मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या मुर्दाड वृत्तीवर आगपाखड केली जात आहे. व्यंगचित्रे, चुटके, किस्से तसेच उपरोधिक शैलीत मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. 

सोशल मीडियाचा गैरवापर...

मुंबईत दोन दिवसांपूर्वी चारचाकी टो करून पोलिसांनी क्रेनने नेल्याची क्लिप सोशल मीडियावर पसरली.  या वाहनात लहान बाळाला त्याची आई स्तनपान करत होती; पण नंतर हे शूटिंग करणार्‍या तरुणानेच असे कृत्य त्या महिलेला करायला लावल्याचे समोर आल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. परिणामी एका कर्तव्यदक्ष पोलिस हवालदाराला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. या घटनेतील सत्य शोधण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. 

मग असे का होत नाही?

एखादा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर पोलिसांकडून दिल्या जाणार्‍या प्रेसनोटमध्ये पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक अशा सर्वांची नावे आणि मार्गदर्शन लाभल्याचा उल्लेख असतो. मग पोलिसांकडून घडणार्‍या चुकांवेळी अशा सर्वांची नावे कलम 34 नुसार का जबाबदार धरली जाऊ नयेत, असे मेसेजही फिरत आहेत. बहुतांश  पोलिस प्रामाणिकपणे काम करतात. 12 ते 14 तास काम करून लोकांना मदत करतात; पण  युवराज कामटेसारख्या एखाद-दुसर्‍याच्या चुकीच्या कृतीने सर्वच पोलिस दलाची बदनामी होते ही शोकांतिका म्हणावी लागेल.