Thu, Jul 18, 2019 14:54होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या तेजस्‍वीनीचा राष्‍ट्रकुलमध्ये 'रौप्य'वेध

राष्‍ट्रकुल: कोल्‍हापूरच्या तेजस्‍वीनीचा 'रौप्य'वेध

Published On: Apr 12 2018 11:14AM | Last Updated: Apr 12 2018 11:33AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्‍हापूरच्या तेजस्‍वीनी सावंतने ऑस्‍ट्रेलियातील गोल्‍ड कोस्‍ट येथे सुरू असणार्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धांमध्ये रौप्य वेध घेतला. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात तिने देशासाठी रौप्य पदक मिळविले. तिला ६१८.९ गुण मिळाले तर सुवर्ण विजेती सिंगापूरची मार्टिनी लिंडसे ६२१ गुणांसह अव्‍वल राहिली. स्‍कॉटलंडला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने चंदेरी कामगिरी केली होती.तिने ५० मी. रायफलमधील वेगवेगळ्या प्रकारात दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली होती.

तेजस्‍वीनी सावंतच्या या पराक्रमामुळे भारताच्या पदकतालिकेत एका पदकाची भर पडली असून भारताकडे आता १२ सुवर्ण, ५ रौप्य पदकांसह एकूण २५ पदके झाली आहेत. तेजस्‍वीनी सावंत ही मूळची कोल्‍हापुरातील असून नेमबाजीत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. इस्‍लामाबादमध्ये २००४ साली झालेल्या ९ व्या आशिया क्रीडा महांसंघाच्या खेळात तिने सुवर्ण पदक मिळवले होते. तेव्‍हा पासून तिचा आंतराष्‍ट्रीय स्‍पर्धांमधील प्रवास सुरू झाला. २००६ साली झालेल्या मेलबर्न राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सिंगल्स आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाई केली होती.

वाचा : Live राष्‍ट्रकुल२०१८ : शूटिंगमध्ये तेजस्‍वीनी सावंतला रौप्यपदक

जर्मनीत म्युनिख येथे २००९ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर म्युनिखमध्येच ५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने ८ ऑगस्ट २०१० रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. या प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. काही महिन्यांपूर्वीच तेजस्‍वीनीचा विवाह झाला आहे. तसेच तिचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते.

Tags : kolhapur, tejaswini sawant, CWG2018, shooting,commonwealth games 2018, silver medal