Tue, Apr 23, 2019 21:48होमपेज › Kolhapur › विश्लेषण : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बनला धोकादायक

विश्लेषण : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बनला धोकादायक

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 27 2018 10:31AMपन्हाळा : राजू मुजावर

कोल्हापूरला कोकणाशी जोडणार्‍या चार मार्गांपैकी सर्वात जवळचा व मोठा मार्ग म्हणजे कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे हाच कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग अपघातांचे माहेरघर बनला आहे. गेल्या एक वर्षात या महामार्गावर वाघबीळ ते शाहूवाडी तालुक्यातील भाडळे खिंड या 10 किलोमीटर अंतरात कोडोली पोलिसांकडे नोंद झालेल्या अपघातांची संख्या 12 आहे. यामध्ये 15 जण जखमी झाले असून, 6 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय रोजच होणार्‍या; पण कोठेही नोंद नसणार्‍या छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या जास्त असून यामध्ये अनेकजण किरकोळ जखमी तर काहीजणांना अपंगत्व आले आहे. अपघातांची मालिका वाघबीळ येथील पेट्रोल पंपासमोर असणार्‍या माले फाट्या पासून सुरू होते. समोरून येणारी वाहने भरधाव येतात, मालेमार्गे येणारी वाहने न दिसल्याने अचानक समोर येणार्‍या वाहनास चुकवताना अपघात होतोच; तीच अवस्था बोरपाडळे फाट्यावर आहे. रस्त्यावरील बाजूपट्ट्यांवर अनेक व्यवसायिक दुकाने मांडून बसले असल्याने व दररोज भाजी विक्री याच रस्त्यावर वाहने थांबवून होत असल्याने  गर्दी होते, ही गर्दी अपघातास कारणीभूत ठरत आहे.

वाचा: कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

डोंगर-दर्‍यांतून जाणारा चढ- उतारांनी बनलेला कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग, असंख्य नागमोडी वळणांनी बनलेला हा रस्ता. पूर्वीचे संरक्षक कठडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून डागडुजी होत नसल्याने अखेरची घटका मोजत आहेत. तर काही ठिकाणी संरक्षक कठडे पूर्ण ढासळले असून त्याचे अवशेष शिल्लक आहेत.
घाट चालू होताना वेग मर्यादेचा सूचना फलक असणे गरजेचे आहे. या सूचना फलकांच्या अभावामुळे  वेगावर नियंत्रण न राहिल्याने अथवा वळणाचा अंदाज न आल्याने वाहने दरीत कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

वाचा: कोल्हापूर : भीषण अपघात; स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य (video)

रत्नागिरी बंदराला जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांबरोबरच इतर वाहनांची जास्त वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने अलीकडेच हा रस्ता करून घेतला आहे. पण पहिल्या पावसातच मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने भरधाव वाहनांना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. तसेच रस्ता नवीन करत असताना घाईगडबडीत भरलेल्या बाजूपट्ट्या पावसाळ्यात खचल्याने  रस्त्याला लागून फूट दीड फुटाची चर तयार झाली आहे. त्यामुळे भरधाव वाहनांना चुकवण्यासाठी किंवा अन्य कारणाने बाजूपट्टीवर वाहने घेणे म्हणजे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. 

रस्ता दुरुस्ती व रूंदीकरणाच्या नावाखाली महामार्गाला जोडणार्‍या छेद रस्त्यांवरील गावांच्या नावाचे फलकही काढून टाकले आहेत. त्यामुळे प्रवाशांना चुकीच्या मार्गाने जावे लागल्याने विनाकारण वेळेचा व पैशाचा फटका बसत आहे. तर छेद रस्ता सूचना फलक नसल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक कठड्यांची दुरुस्ती, बाजूपट्ट्या भरणे, छेद रस्ता सूचना फलक, वेग मर्यादेचा सूचना फलक इत्यादी कामे करून घेऊन होत असलेली जीवित व वित्तहानी थांबविणार का, असा संतप्त सवाल प्रवासी व वाहनचालकांतून केला जात आहे. अनेक हॉटेल व्यवसायिकांच्या दारातून या हायवेवर वाहने पार्क होतात. रस्ता वाहतुकीस अडथळा होतो; पण हा अडथळा बंद कोण करणार, चायनिजच्या गाड्या, बेकरीउत्पादने विक्री रस्त्याच्या कडेला टपर्‍यांमधूनच होते. नियम धाब्यावर बसवून बाजूपट्ट्यांवरच टपर्‍या वसल्या आहेत. मग विशेष बांधकाम विभागाची डोळेझाक का? हाच रस्ता पंचगंगा पुलापासून आंबेवाडीपर्यंत व ते केर्लीपर्यंत अनेक ठिकाणी खचत आहे. मोठ्या भेगा पडत आहेत, या रस्त्यावर बाजूपट्ट्याही तुटल्या असल्याने दोन गाड्या ओव्हरटेक होताना वाहनचालकांची कसरत होते.  सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाबाबत लक्ष घालून हा महामार्ग समस्यांच्या गर्तेतून सोडवावा, अशा अपेक्षा नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत.