Thu, Jun 27, 2019 01:55होमपेज › Kolhapur › चला कोल्हापूर दर्शनाला, रंकाळ्यातील केंदाळ बघायला

चला कोल्हापूर दर्शनाला, रंकाळ्यातील केंदाळ बघायला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातल्या सिटीबसवर लावण्यात आलेली एक जाहिरात सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलीय. सायंकाळच्या पिवळ्या किरणांसोबत अल्हाददायक वार्‍याची झुळूक अनुभवून देणारं ठिकाण म्हणून रंकाळ्याची ओळख आहे. पण, कोल्हापूरच्या पर्यटनाची जाहिरात करताना चक्क या रंकाळ्यात केंदाळ आल्याचंही दाखवण्यात आलंय.

आता अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एखाद्या भाविकानं शहरात रस्त्यांवरून धावणार्‍या केएमटी बसवर ही जाहिरात पाहिली, तर तो जाईल का रंकाळ्यावर? जाहिरात करताना यांना रंकाळ्याचा चांगला फोटो मिळाला नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. फिरोज शेख या एका जागरूक कोल्हापूरकरानं शुक्रवारी (30 मार्च) हा फोटो काढला असून, फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवर फोटो व्हायरल होऊ 
लागलाय. 

कोल्हापूर हे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या पर्यटनस्थळांपैकी एक. अंबाबाई, जोतिबा यांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करवीर नगरीत अनेक पर्यटनस्थळं आकर्षित करतात. रंकाळा त्यापैकीच एक. पण, गेल्या काही वर्षांत रंकाळा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पहायचं काय? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. त्यातच रंकाळ्याची आणि करवीरच्या पर्यटनाची जाहिरात करताना  रंकाळा केंदाळसह दाखवण्यात आल्यानं कोल्हापूरकरांचा संताप होत आहे. 

मुळात रंकाळ्यात आता केंदाळ मोठ्या प्रमाणावर नाही. रंकाळ्यातील पाणी प्रदूषण हा वेगळा विषय आहे. पण, कोल्हापूरची अस्मिता असलेल्या रंकाळ्याची जाहिरात, अशी केली जाते ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

Tags : KMT  bus, kolhapur rankala  


  •