Mon, Nov 19, 2018 23:24होमपेज › Kolhapur › तरुणाला चाबकाने फोडणार्‍या गुंडावर अखेर गुन्हा दाखल

तरुणाला चाबकाने फोडणार्‍या गुंडावर अखेर गुन्हा दाखल

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

तरुणाला चाबकाने फोडून दहशत माजविणारा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विश्‍वनाथ ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे (वय 22, रा. राजेंद्रनगर) याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला.

भरचौकात घडलेल्या घटनेची दखल घेत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बिल्डर कांबळेसह टोळीतील सराईतांविरुद्ध संभाव्य कारवाईसाठी तत्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश शनिवारी अधिकार्‍यांना दिले आहेत. दरम्यान, अमानुष मारहाणप्रकरणी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या जखमी तरुणाची विचारपूस करण्याऐवजी उपदेशाचे डोस पाजून त्याला पिटाळून लावणार्‍या अधिकारी व पोलिसांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना शनिवारी सकाळी दिले आहेत.

किरकोळ कारणातून भरचौकात तरुणाला चाबकाने फोडल्याच्या अमानुष घटनेवर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संशयिताविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातून होऊ लागली आहे. संशयित विश्‍वनाथ ऊर्फ बिल्डर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राजारामपुरीसह अन्य पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी बिल्डरसह टोळीला जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते.

जखमी अक्षय ऊर्फ आकाश वाल्मिकी फुलोरे ( 22, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) याचा भाऊ रोहितची चार दिवसांपूर्वी म्होरक्यासह समर्थकाशी वादावादी झाली होती. या घटनेनतर रोहित भीतीपोटी पळून गेला आहे.  रोहितला जाब विचारण्यासाठी आलेल्या बिल्डरने त्याचा भाऊ अक्षयला घरातून फरफटत भरचौकात आणले.

लोकांसमोरच घोड्याच्या चाबकाने त्याला फोडून काढले होते. मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संशयित कांबळे पसार झाला असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.