होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दमदार; नद्यांच्या पातळीत वाढ

जिल्ह्यात दमदार; नद्यांच्या पातळीत वाढ

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू होती. पावसाने नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दीड फुटांनी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन दिवसांत राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर होता. दिवसभर अनेक ठिकाणी संततधार होती. शहर आणि परिसरातही पाऊस थांबून थांबून पडत होता. काही काळ विश्रांती घेऊन पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. ताराराणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय-स्टेशन रोड आदी ठिकाणी पाणी साचले होते. गटारी, नाले दुथडी भरून वाहत होते. जयंती नाल्याच्याही पाणी पातळीत वेगाने वाढ झाल्याने नाला थेट पंचगंगेतच मिसळत होता.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. चिकोत्रा वगळता सर्वच धरण परिसरात चांगला पाऊस झाला. कोदे धरणाच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणात आज सकाळी आठ वाजता 2.24 टी.एम.सी.पाणीसाठा झाला. वारणा धरणही 40 टक्के भरले आहे. दूधगंगा धरणातील पाणीसाठा 26 टक्क्यापर्यंत वाढला आहे. पाणी वाढू लागल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 1088 क्युसेक, दूधगंगा धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता 10.6 फुटांवर होती. सायंकाळी ती 11.8 फुटांपर्यंत वाढली.

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत सरासरी 14.15 मि.मी. पाऊस झाला. चंदगडमध्ये सर्वाधिक 43.83 मि.मी.पाऊस झाला. गगनबावड्यात 42.50मि.मी., राधानगरीत 19 मि.मी., आजर्‍यात 16मि.मी., शाहूवाडीत 13 मि.मी., कागलमध्ये 11 मि.मी. पाऊस झाला. भुदरगडमध्ये 9 मि.मी. पाऊस झाला. पन्हाळा, करवीर, गडहिंंग्लजमध्ये प्रत्येकी 4 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 7 मि.मी. पाऊस झाला.