होमपेज › Kolhapur › प्रवासी पूल ‘फास्ट ट्रॅक’वर

प्रवासी पूल ‘फास्ट ट्रॅक’वर

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी

रेल्वेस्थानकासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे काम गतीने सुरू आहे. येत्या 20 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांत या पुलाचा प्रवाशांसाठी वापर सुरू होण्याची शक्यता आहे.

राजारामपुरी परिसरातून रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बाहेर पडलेल्यांना तर स्टेशन रोडमार्गेच रेल्वेस्थानकावर ये-जा करावी लागते. या सर्वाचा विचार करून या परिसरातून ये-जा करणार्‍या प्रवाशांसाठी पादचारी पूल उभारण्याचा रेल्वेने निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे 2 कोटींहून अधिक निधी खर्च करून हा पूल उभारण्यात येत आहे. जून 2015 साली या पुलासाठी टेंडर प्रक्रिया झाली होती. यानंतर निधीअभावी, तसेच रचनेत झालेल्या बदलामुळे हे काम रखडले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या कामाला गती आली आहे.  येत्या 20 मार्चपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्याद‍ृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.

प्रशस्त आणि आरामदायी पूल
हा पूल प्रवाशांच्या भविष्यातील गर्दीचा विचार करून अधिक प्रशस्त आणि आरामदायी करण्यात आला आहे. राजारामपुरीच्या दिशेने रॅम्प आहे, तर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. वयोवृद्ध व लहान मुलांनाही सहज वापरता येतील अशा उंचीच्या या पायर्‍या बनवण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उतरण्यासाठी रॅम्प ठेवण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी आणखी एक तिकीट खिडकी
सध्या स्थानकावर एकाच ठिकाणी तिकीट विक्री होते. या नव्या पुलाच्या प्रवेशद्वारावरच आणखी एक तिकीट विक्री खिडकी (बुकिंग ऑफिस) सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राजारामपुरीच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांना तिकिटासाठी मुख्य स्थानक इमारतीत जाण्याची गरज भासणार नाही. या ठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुलावर चार एक्स्लेटर
या पुलासाठी चार एक्स्लेटर (सरकते जिने) ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक बांधकाम करण्यात आले आहे. राजारामपुरीकडून येणार्‍या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी दोन, तसेच प्लॅटफार्म क्रमांक 1 व 2 वर ये-जा करण्यासाठी दोन असे एकूण चार एक्स्लेटरचे काम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले 
नाही.

स्थानकावर दोन लिफ्ट होणार
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व प्लॅटफॉर्म क्रमांक तीन याला जोडण्यासाठी प्रवासी पूल आहे. या पुलाचा प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील जिना अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. या ठिकाणी लिफ्ट उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.