Sun, Jan 20, 2019 06:07होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाचे वर्षात विद्युतीकरण

कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाचे वर्षात विद्युतीकरण

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:52AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी कंत्राटदारांना निश्‍चित कालावधी देण्यात आला आहे. यामुळे या मार्गाचे काम या वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. यासह सर्वाधिक गर्दी असलेल्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसला आणखी एक जादा डबा जोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 26 फेब्रुवारी 2016 रोजी मांडलेल्या रेल्वेच्या अखेरच्या अर्थसंकल्पात केली होती. यासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. या कामासह पुणे-मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचेही काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व कामासाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाले आहे.

कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी या मार्गाचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार काम सुरू आहे. यामुळे या मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मालवाहतुकीसाठीही एसी डबा शक्य

कोल्हापूर-मुंबई मार्गावर भाजीपाला, दूध, फुले आदींची वाहतूक करण्यासाठी एसी डबा जोडण्याची रेल्वेची तयारी आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुंबईत मालवाहतूक होते. मात्र, रेल्वेद्वारे केली जाणारी वाहतूक शेतकर्‍यांना सोयीची ठरत असेल, त्यांची मागणी असेल, तर हा निर्णयही तत्काळ घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.