Fri, Apr 26, 2019 09:32होमपेज › Kolhapur › ब्लॉगः काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना बळाचे टॉनिक

ब्लॉगः काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना बळाचे टॉनिक

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण कोल्हापूर दौर्‍यावर येऊन गेल्याने राजकीयद‍ृष्ट्या जिल्हा ढवळून निघाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे काऊंट डाऊन सुरू झाल्याच्या वातावरणाची अनुभूती यानिमित्ताने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांना आली. फडणवीस यांनी घटक पक्षांना अधिक महत्त्व दिले, तर ठाकरे यांनी स्वपक्षातर्फेच जाहीर सभा घेतल्या. चव्हाण यांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना बळाचे टॉनिक देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तर आमदार सतेज पाटील यांनी कृषिप्रदर्शनाच्या माध्यमातून भाजपला वगळून सर्वपक्षयीय नेत्यांना एकत्र केले.

गेल्या दहा दिवसांतील या राजकीय घडामोडींनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण केले. जिल्ह्यात भाजप वाढीसाठी गेल्या दोन तीन वर्षांपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि साखर कारखान्यांपासून गोकुळ व जिल्हा बँकेपर्यंत त्यांनी पक्षाला प्रवेश मिळवून दिला. फडणवीस यांच्या दौर्‍यात विशेषत्वाने विनय कोरे आणि समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबर हुतात्मा कारखान्याच्या वैभव नायकवडींपर्यंत तिहेरी संगम साधण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना उठावाचे सल्ले दिले. तर खा. अशोक चव्हाण यांनी पक्षातील विस्कळीत नेत्यांना एकत्र आणत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर संधान साधले.

खा. चव्हाण यांनी भाजप आणि सेनेच्या नेत्यांपेक्षा वेगळी खेळी करीत काँग्रेसच्या विस्कळीत नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री प्रकाश आवाडे पक्षापासून दूरच आहेत; पण त्यांच्यासह माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्याशी चव्हाण यांनी संपर्क करीत कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील यांच्यातील दरीही कमी करण्यासाठी दोघांच्याही निवासस्थानी भेट देत चर्चा केली. पक्षाचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याबद्दल चव्हाण थेट बोलले नाहीत; पण पतंगराव कदम यांनी ते आपलेच होतील असा निर्वाळा दिला. सध्या आ. पाटील आणि महाडिक यांच्यात राजकीय संघर्ष जोरात असताना कदम यांच्या या वाक्याने वेगळाच संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला.

थेट विरोधकालाच हाताशी धरण्याचा प्रयत्न खा. चव्हाण यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सत्तेच्या काळात सरकारविरोधात आंदोलनांद्वारे रान उठविणारे खा. शेट्टी यांच्या घरी त्यांनी भेट दिली. त्यांच्याशी गुप्तगु करीत मैत्रीचा हात पुढे केला. हेच शेट्टी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात भाजपसोबत होते. नंतर भाजप सरकारचे घटक पक्ष म्हणून सहभागी झाले आणि अलीकडे सरकारमधून बाहेर पडले. सध्या ते सरकारच्याविरोधात असल्याने चव्हाण यांनी त्यांच्याशी संपर्क साधत आपल्याबरोबर राहण्याचे आवाहन केले. यानंतर अवघ्या चारच दिवसांत आ. पाटील यांनी कृषिप्रदर्शनाच्या निमित्ताने शेट्टी यांना निमंत्रित केले. या कार्यक्रमाला शेट्टींसह शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील हे तीन आमदार उपस्थित राहिले. राजीव आवळे व सुरेश साळोखे हे दोन माजी आमदारही आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना बोलाविले होते. अशाप्रकारे आ. पाटील यांनी भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणले.

भविष्यातील राजकारणाची  चुणूक 
माजी आमदार महादेवराव महाडिक आणि कुटुंबीयांची भाजपशी असलेली जवळीक हे कारण असतानाच प्रदेश अध्यक्षांच्या धोरणांनुसार त्यांनी भाजप वगळता इतर पक्षांच्या नेत्यांनाच प्राधान्य दिले. भविष्यातील राजकारणाची ही चुणूक असावी काय, अशी चर्चा त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. महाडिक वगळून सर्वजण अशीच सतेज पाटील यांची बांधणी सुरू झाली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.