Tue, Apr 23, 2019 06:23होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : पत्‍नीला गोळ्या घालून पोलिसाची आत्‍महत्‍या

कोल्‍हापूर : पत्‍नीला गोळ्या घालून पोलिसाची आत्‍महत्‍या

Published On: Jan 30 2018 5:23PM | Last Updated: Jan 31 2018 1:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबईतून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस निरीक्षकाने पत्नीच्या डोक्यात गोळी घालून स्वत: आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. बबन पांडुरंग बोबडे (वय 65) व रेखा बबन बोबडे (60, रा. विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्स, देवकर पाणंद) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नातेवाइकांना जबर धक्‍का बसला असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

बबन बोबडे यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील खटाव असून, गेल्या वर्षभरापासून निकम पार्क परिसरातील विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये मनीषा घोटगे यांच्या फ्लॅटमध्ये राहण्यास होते. मंगळवारी सकाळी मोलकरणीने दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या कॉलनीतील नातेवाइकांना याची माहिती दिली. बोबडे यांची नात सून संध्या आडसुळे यांनी डुप्लिकेट चावीने फ्लॅट उघडून आत प्रवेश केला असता हा प्रकार उजेडात आला. बोबडे यांना दोन मुले असून, सचिन बोबडे 
हा मुंबईत हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करतो. तर संतोष बोबडे हा एअरफोर्समध्ये नोकरीस असून, पुण्यात राहतो. सोमवारी बबन बोबडे यांनी सचिनला कोल्हापूरला येण्यास सांगितले होते. फ्लॅट सोडायचा असून, संतोष व मामाला सोबत आण, असे सांगितल्याचे मुलगा सचिनने पोलिसांना सांगितले.

झोपलेल्या अवस्थेत मृतदेह

विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर फ्लॅट नं. 503 मध्ये बोबडे दाम्पत्य राहण्यास होते. वन बीएचके फ्लॅटमध्ये दोघेच राहत होते. आतील बेडरूममध्ये बेडवर दोघे झोपलेल्या अवस्थेत मिळून आले. बोबडे यांच्या उजव्या खांद्याजवळ रिव्हॉल्व्हर पडले होते. तर बेडवर, तसेच बेडखाली रक्‍त साचले होते.

चिठ्ठ्यांद्वारे सूचना

बोबडे यांनी दारावर फ्लॅटची किल्‍ली कोठे आहे, हे लिहिले होते. हॉलमधील टी.व्ही.जवळ ठेवलेल्या पाकिटात रिव्हॉल्व्हरचा परवाना असून, तो पोलिसांना द्यावा, असे लिहिले आहे. टीपॉयवरील चिठ्ठीत मोलकरणीला देण्यासाठी 300 रुपये ठेवल्याचा, तसेच एअरफोर्समध्ये नोकरीस असलेल्या मुलाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला आहे.
बोबडे दाम्पत्य सकाळी अकराच्या सुमारास रंगकमलनगरातील नातू महेश आडसुळे यांच्याकडे जात होते. दुपारपर्यंत त्यांच्याकडे थांबून तीनच्या सुमारास घरी परतत असत. सायंकाळी रेखा बोबडे फिरायला परिसरातील बागेत जात होत्या. तर रात्री नऊच्या सुमारास जेवण करून दोघे झोपी जात. त्यांचा शेजार्‍यांशी जास्त संपर्क नव्हता, असे फ्लॅटधारकांनी सांगितले.

रिव्हॉल्व्हर परवाना

पोलिस निरीक्षक असताना 2001 साली बोबडेंनी मुंबई पोलिस आयुक्‍तांकडून शस्त्र परवाना मिळविला होता. त्याचे नूतनीकरण 31 डिसेंबर 2016 रोजी केले असून, ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत वैध असल्याचा उल्‍लेखही एका चिठ्ठीत करण्यात आला आहे.

काका शिस्तप्रिय

बोबडे दाम्पत्य गेले वर्षभर विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये राहण्यास आहे; पण त्यांचा जास्त संपर्क नव्हता. मागील महिन्यात झालेल्या अपार्टमेंटच्या बैठकीवेळी बबन बोबडे पहिल्यांदाच उपस्थित होते. त्यांनी पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला होता. बबन बोबडे अत्यंत शिस्तप्रिय होते, असे रहिवाशांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट

देवकर पाणंद येथील घटनेची माहिती मिळताच शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक अनिल गुजर घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनीही घटनास्थळी भेट देऊन अधिकार्‍यांना तपासाबाबत सूचना केल्या. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर पंचगंगा स्मशानभूमीत दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘तिच्या’ धाकदपटाचा त्रास होतोय

मृतदेहाजवळ मिळालेल्या एका चिठ्ठीत ‘तिच्या’ धाकदपटशाहीने दोघांना आजारपण जडले आहे. माझे बायपास झाले आहे, ‘तिच्या’ मोठ्या आवाजाने आणि धमकीने छातीत धडधडू लागते. ‘तिच्या’ धास्तीने पत्नीचा मधुमेह वाढला, माझा रक्‍तदाब वाढून आयुष्याचे मातेरे केले, असे लिहिले असून ही चिठ्ठी पोलिसांनी जप्‍त केली आहे. याबाबत नातेवाइकांचे जबाब नोंदवून पोलिस अधिक माहिती घेत आहेत.