Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Kolhapur › पोलिसांचा शहिदांच्या प्रतिमांसह ‘झिंगाट’ डान्स 

पोलिसांचा शहिदांच्या प्रतिमांसह ‘झिंगाट’ डान्स 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

पोलिस दल व आय अ‍ॅम फिट क्‍लबच्या वतीने इचलकरंजीत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी उत्साही युवकांनी शहिदांचे फलक हातात धरून ‘झिंगाट’ डान्स केल्याने संतापाची लाट उसळली आहे. काहींनी उत्साही कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर वादावादीही झाली. विशेष म्हणजे काही पोलिसांनीही ठेका धरला. या प्रकराची गंभीर दखल गृह राज्यमंत्र्यांनी घेतल्याने इचलकरंजीची मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. 

दरम्यान, अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या निकालावरूनही वाद निर्माण झाला. 21 किलोमीटरची स्पर्धा कोरोचीच्या युवकाने जिंकल्यानंतर त्याचा क्रमांक डावलण्यात आला. त्यामुळे कोरोचीतील नागरिकांनी गोंधळ घातल्यानंतर निकाल राखून ठेवण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. 

कोल्हापूर पोलिस व आय अ‍ॅम फिट क्लबच्या वतीने 26/11च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरच्या स्पर्धा फॉर्च्युन प्लाझा येथून सुरू झाल्या. कोल्हापूर पोलिस सहभागी असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घेतला. 

स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मोठ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी उपस्थित हाते. रविवारी स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच युवक पारितोषिक वितरणस्थळी जमा झाले. चित्रपटांतील गीते यावेळी लावण्यात आली. या गीतांवर युवकांनी शहिदांची छायाचित्रे हातात घेऊन नृत्य करण्यास सुरुवात केली. काहींनी त्याला आक्षेप घेतला; मात्र सेलिब्रेशनच्या नावाखाली त्यांना गप्प बसवण्यात आले. दोन गटांत धक्‍काबुक्‍कीचे प्रकारही घडले. विशेष म्हणजे कोरोचीतील एका युवकाचा 21 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला; मात्र संयोजकांनी त्याला डावलून दुसराच युवक प्रथम आल्याचे जाहीर केले. याला कोरोचीतील युवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे 21 किलोमीटरचा निकाल तर राखून ठेवलाच, त्याचबरोबर उर्वरित दोन्ही गटांचा निकालही सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात आला नाही. पोलिस खाते संयोजक असलेल्या आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या स्पर्धेमध्येच शहिदांचा अवमान झाल्यामुळे शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या पोलिस खात्यातील अधिकार्‍यांनी बलिदान दिले, त्यांना आदरांजली म्हणून पोलिस दलातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उत्साही कार्यकर्त्यांनी केलेला झिंगाट डान्स संतापजनक असला तरी त्यात पोलिस कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवून कहर केल्याची संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहे. 

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची हजेरी 
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनी उद्घाटन केलेल्या कार्यक्रमातच शहिदांचा अवमान झाल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. 

उद्देशालाच हरताळ 
 26/11 च्या घटनेवेळी शहीद झालेल्या जवान व पोलिस अधिकार्‍यांना देशभर श्रद्धांजली वाहण्यात आली; पण इचलकरंजीत या दिनाचे निमित्त साधून चक्‍क सेलिब्रेशन करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संयोजकांना या दिनाचे भानच उरले नाही. परिणामी, उद्देशालाच हरताळ फासण्यात आला.