होमपेज › Kolhapur › ऑन ड्युटी 15 तास!

ऑन ड्युटी 15 तास!

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 12:00AMकोल्हापूर : दिलीप भिसे

पोलिस दलावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचे वेळापत्रक जाहीर झाले असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र लोकसंख्येच्या तुलनेत अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिस यंत्रणेची मोठी परवड होत असल्याचे चित्र आहे. विशेषकरून कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात बारा नव्हे, पंधरा-पंधरा तास पोलिसांना रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावावे लागते.

पोलिस दलामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा होत आहे. हे बदल स्वागतार्ह असले तरी ग्रामीण भागातील पोलिसांवरील समस्यांचे ओझे कमी करण्यासाठीही वेळीच ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.  अपुर्‍या मनुष्यबळासह मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी बंदोबस्तासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात पोलिस दलावर कमालीचा ताण पडत आहे. त्यात गुन्ह्यांचा आलेख रोखत, शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवताना यंत्रणेला तारेवरची कसरतच करावी लागते. ही वस्तुस्थिती वरिष्ठ अधिकारीही नाकारू शकत नाहीत. सद्यस्थितीत ग्रामीण भागात पोलिसांना 12 तास ड्युटी असली तरी प्रत्यक्षात मात्र अतिरिक्त कामासाठी पंधरा तास कर्तव्य बजवावे लागते. आणीबाणीच्या काळात तर त्यांच्यावर वेळेचे बंधनच नसते, ही वस्तुस्थिती आहे.  

अधिकार्‍यांच्या मंजूर, रिक्त पदाचा लेखाजोखा
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलाकडे उपलब्ध फौजफाटा अत्यंत अपुरा असल्याने त्याचा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामावर अमर्याद ताण पडत असल्याचे चित्र आहे. पोलिस अधीक्षकासह दोन अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक 8, पोलिस निरीक्षक 31, सहायक निरीक्षक 39, पोलिस उपनिरीक्षक 99 अशी अधिकार्‍यांची पदे मंजूर आहेत. सध्या कोल्हापूर पोलिस दलात अप्पर पोलिस अधीक्षक 1, पोलिस निरीक्षक 1, उपनिरीक्षक 9 एवढी पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यात 2 हजार 938 पोलिसांची मंजूर पदे
कोल्हापूर पोलिस दलासाठी 2 हजार 938 पोलिसांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात 2 हजार 853 पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. 85 पदे रिक्त आहेत. दरमहा सरासरी सहा ते सात कर्मचारी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होण्याचे प्रमाण आहे.

तब्बल 72 तास पोलिस रस्त्यावर 
सरत्या वर्षाला निरोप देताना शहर, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिस दलाने खबरदारी घेतली. सारा फौजफाटा थर्टीफर्स्टला पहाटेपर्यंत रस्त्यावर होता. हा बंदोबस्त होतो न होतो तोच दि.1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद उमटले. कोल्हापुरात दगडफेकीसह मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. मोर्चा- प्रतिमोर्चामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. तणावपूर्ण स्थितीत दुसर्‍याच दिवशी बंद पुकारण्यात आला. या सार्‍या घटनाक्रमात पोलिस दलाची तारांबळ उडाली. 

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्यासह अधिकार्‍यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून 72 तास रस्त्यावर काढले. ही बाब लक्षणीय आहे.

अतिरिक्त मनुष्यबळाची गरज
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलाकडे उपलब्ध अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा अपुरा आहे. जिल्ह्यातील 31 पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण, आरोपी पार्टी, ट्रेझरी, बँका, कोर्ट, व्हीआयपी बंदोबस्त, लोकप्रतिनिधींची सुरक्षा, मोर्चे, आंदोलने याचा सारासार विचार केल्यास उपलब्ध फौजफाटा तुलनेत अपुरा आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिस दलासाठी आणखी दीड हजारांवर मनुष्यबळाची भविष्यात गरज भासणार आहे.