होमपेज › Kolhapur › महामार्ग खड्डेयुक्त 

महामार्ग खड्डेयुक्त 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

मुदतीपूर्वीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील तालुका आणि जिल्हा मार्ग खड्डेमुक्त झाले असून, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग मात्र खड्डेयुक्तच आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंधरा डिसेंबरपूर्वी राज्य खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असून, त्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्हे आघाडीवर आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंतच या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुका आणि जिल्हा मार्ग खड्डेमुक्त झाल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांत खूपच कमी झाल्याचे चित्र आहे. जिकडे जाल तिकडे खड्डे भरण्याचेच काम सुरू असून, त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या साखर हंगाम सुरू असून, ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि ट्रकची संख्या अधिक आहे. गावागावांतून तालुकामार्ग, जिल्हामार्ग आणि महामार्गावरून ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. उसाने भरलेले ट्रॅक्टर आणि ट्रक यांना खड्ड्यांचा अधिक त्रास होत असून, काही ठिकाणी ही वाहने उलटण्याच्या घटनाही घडत होत्या; पण खड्डे भरल्याने वाहतूक सुरळित होऊ लागली आहे. महामार्गावरून ही वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे वाहनचालकांचे मत आहे.

जिल्ह्यात रत्नागिरी महामार्ग अत्यंत धोकादायक बनल्याच्या प्रतिक्रिया आहेत. वाघबीळ घाटापर्यंत हा रस्ता सुस्थितीत आहे; पण तेथून पुढे आंबा घाटापर्यंत महामार्गाची वाट लागल्याची स्थिती आहे. पैजारवाडी, आवळी, डोणोली, गोगवे, भेरैवाडी ते मलकापूरपर्यंत साधारणपणे एक ते दीड फूट खोलीचे आणि चार फुटांहून अधिक रुंदीचे खड्डे आहेत. मलकापूरपासून आंबा घाटापर्यंतचा प्रवास तर वाहनधारकांच्या दृष्टीने दिव्यच ठरत आहे. खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायत ठरत असून, वाहनांचे कमानपाटे निकामी होत आहेत, तर प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला कोणी वाली आहे की नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांतून उमटत आहेत. या महामार्गाची जबाबदारी असणारे अधिकारी झोपले आहेत, की त्यांना वाहनधारक आणि प्रवाशांच्या जीवाचे देणे-घेणे नाही, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री खड्डेमुक्तीसाठी जीवाचे रान करून महाराष्ट्रभर दौरा करीत असताना या महामार्गाची देखभाल आणि दुरुस्ती करणारे अधिकारी कोठे व्यग्र आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. खड्डेमुक्तीसाठी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात वाहनधारक आहेत.