Wed, May 22, 2019 14:33होमपेज › Kolhapur › पिस्तूल रोखून, हवेत गोळीबार प्रकरण : मानसिंग बोंद्रेस अटक

पिस्तूल रोखून, हवेत गोळीबार प्रकरण : मानसिंग बोंद्रेस अटक

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:50AM

बुकमार्क करा

 
कोल्हापूर : प्रतिनिधी
देवदर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील उद्योजकावर भरलेले पिस्तूल रोखल्याप्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे (वय 30, रा. शालिनी पॅलेस पिछाडीस) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ताराबाई पार्कातील एका हॉटेलबाहेर गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. रात्री उशिरा बोंद्रे यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
कर्नाटकातील उद्योजक अनंत प्रेमनाथ शेट्टी (वय 43, रा. मंगळूर) हे बहिणीसोबत देवदर्शनासाठी आले आहेत. शनिशिंगणापूर येथे देवदर्शन करून मंगळवारी पहाटे ताराबाई पार्कातील हॉटेलजवळ आले. गाडी गेटसमोर उभी करून हॉटेलची चौकशी करण्यासाठी शेट्टी आत गेले. यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक मोटार हॉटेलजवळ आली. वाहन मागे घेण्यावरून वाहनात बसलेले मानसिंग बोंद्रे आणि शेट्टी यांच्यात वाद झाला.
वादावादीनंतर चिडून मानसिंग बोंद्रे यांनी थेट शेट्टी 
यांच्यावर पिस्तूल रोखले. डोक्यापासून पायापर्यंत दोनवेळा पिस्तूल फिरवले. यानंतर शिवीगाळ करत बोंद्रे काही अंतरावर गेले. तेथे त्यांनी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याने अनंत शेट्टी यांची बहीण आणि ते अवाक् झाले. त्यानंतर शेट्टी यांनी देवदर्शन करून थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली.
मानसिंग बोंद्रेस अटक
पोलिसांनी वाहनाचा क्रमांक मिळवला. पसिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मानसिंग बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला. सायंकाळी मानसिंग बोंद्रे यांना अटक करण्यात आली. पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.