Sun, May 26, 2019 18:52होमपेज › Kolhapur › पन्हाळ्याच्या ऐतिहासिक वास्तू ‘पुरातत्त्व’कडून बंद

पन्हाळ्याच्या ऐतिहासिक वास्तू ‘पुरातत्त्व’कडून बंद

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:16AM

बुकमार्क करा

पन्हाळा : प्रतिनिधी

ऐतिहासिक इमारतींच्या परिसरात टपर्‍या, अतिक्रमणे, रस्त्यावरील खेळण्यातील गाड्यांच्या वर्दळीमुळे ऐतिहासिक वास्तूंच्या सौंदर्यास बाधा येत आहे. वारंवार सूचना देऊनही नगरपालिकेकडून या परिसरातील अतिक्रमणे, मार्गावरील अडथळे दुर होत नसल्याने सोमवारी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांनी तीन दरवाजा येथील वाहतूक रस्ता, सज्जाकोठी तसेच अंधार बाव  व अंबरखाना (धान्य कोठार) या इमारती बंद करण्याची कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे पर्यटकांतून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. दुपारी झालेल्या संयुक्‍त बैठकीत नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी दोन दिवसांत अतिक्रमणप्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर या इमारती खुल्या करण्यात आल्या. 

सकाळी 10 च्या सुमारास चव्हाण यांच्यासह पथकात जोपर्यंत नगरपालिका येथील व्यावसायिकांना पर्यायी जागा देत नाही व हा परिसर वर्दळमुक्‍त करत नाहीत, तोपर्यंत ऐतिहासिक वास्तू बंद करून कर्मचार्‍यांसह सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सकाळपासून येथे कमालीचा गोंधळ उडाला. यामुळे पन्हाळ्यावर आलेल्या पर्यटकांनी या ऐतिहासिक वास्तू पाहायला न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

पन्हाळ्यातील या ऐतिहासिक वास्तूंच्या सौंदर्यात बाधा येऊ नये, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये आणि पर्यटकांची उत्तम सोय व्हावी, यासाठी अतिक्रमणांबाबत पुरातत्त्व विभागाने नगरपालिकेला अनेक वेळा सूचना, तक्रारी केल्या होत्या; पण त्याची दखल न घेतल्याने अखेर पुरातत्त्व विभागाने हा मार्ग अवलंबला. 

पुरातत्त्व विभागाने येथील रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केल्यामुळे सोमवार पेठ, गुडे भागांतून येणार्‍या दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला. खेळगाडीधारकांनी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन व्यवसायासाठी इतरत्र जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे खेळगाड्या लावतो; पण तात्पुरती परवानागी द्या, अशी विनंती केली. दुपारी नगराध्यक्ष रूपाली धडेल, नगरसेवकांसह, संग्राम भोसले व खेळगाड्यांचे व्यावसायिक यांच्याबरोबर पुरातत्त्वचे चव्हाण यांची संयुक्‍त बैठक झाली. या बैठकीत खेळगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने व्यवसाय करण्याचे ठरले. तर तीन दरवाजा परिसरातील पुरातत्त्वच्या हद्दीतील व्यावसायिकांच्या टपर्‍या व स्टॉल अन्यत्र हलवण्याच्या बाबतीत दोन दिवसांत या ठिकाणी योग्य व्यवस्था करण्याचे नगराध्यक्षांनी आश्‍वासन दिल्यानंतर चव्हाण यांनी मुदत दिली; पण यामध्ये सुधारणा न झाल्यास पुन्हा कडक कारवाई करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला. 

दरम्यान, येथील ऐतिहासिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून अत्यंत प्राचीन असलेल्या या राष्ट्रीय स्मारकांच्या आवारातून होणार्‍या वाहनांच्या वर्दळीमुळे बांधकामाला धोका निर्माण होत आहे. पर्यटकांनी सावधानतेने इमारतीमधून गर्दी न करता वावरावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.