होमपेज › Kolhapur › पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ

पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी पावसाने उघडीप दिली. मात्र, दोन दिवसात झालेल्या पावसाने पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ झाली. शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली, तरी गेल्या 24 तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आजही अतिवृष्टी झाली. 

जिल्ह्यात अनेक भागात पावसाची रिपरिप होती. दुपारपासून मात्र पावसाने उघडीप दिली. शहर आणि परिसरात  सकाळपासूनच कडकडीत ऊन पडले होते. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरण परिसरात आज सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत धुवाँधार पावसाची नोंद झाली. वारणा, कासारी व कडवी हे तीन धरण परिसर वगळता सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पाटगाव (210 मि.मी.), जांबरे (105 मि.मी.), जंगमहट्टी (116 मि.मी.), तर राधानगरी (114 मि.मी.) या परिसरात 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला.

जिल्ह्यातही आज सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 35.86 मि.मी. पावसाची नोंद झाली. चंदगड आणि गगनबावडा तालुक्यातही अतिवृष्टी झाली. चंदगडमध्ये 101 मि.मी., तर गगनबावड्यात 65 मि.मी. पाऊस झाला. भुदरगडमध्ये 50 मि.मी., राधानगरीत 41 मि.मी., आजर्‍यात 38 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 28 मि.मी., शाहूवाडीत 21 मि.मी., पन्हाळ्यात 17 मि.मी., करवीरमध्ये 16 मि.मी., हातकणंगलेत 9 मि.मी., तर शिरोळमध्ये 2 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 25 मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवस झालेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेच्या पातळीतही वाढ सुरू झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 7.4 फुटांवर होती. आज सकाळी ती 11.9 फुटांपर्यंत गेली. दिवसभर पाणी पातळी काहीशी स्थिर होती.