होमपेज › Kolhapur › पंचगंगा नदी बनली प्रदूषणवाहिनी  

पंचगंगा नदी बनली प्रदूषणवाहिनी  

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:41PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

निसर्गसंपन्न आणि सदाबहार पर्यावरणाचा  जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे; पण यंदा मात्र पर्यावरणाबाबत तुलनेने खूपच अनास्था दिसून आली. जयंती नाल्यावरील मैलामिश्रीत पाईपलाईन फुटून शंभर दिवस उलटूनही कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे पंचगंगेची प्रदूषणवाहिनी बनली आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने नागरिकांकडून सुरू असलेला सकारात्मक प्रतिसाद  या चांगल्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जमेच्या बाजू ठरल्या.

यंदाचे सरते वर्ष पर्यावरणाच्या दृष्टीने कभी खुशी, कभी गम अशा पध्दतीचे दिसून आले. कारण जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय असलेले पंचगंगा प्रदूषणमुक्ती, रंकाळा संवर्धनाबाबत काही ठोस काम झाले नाही. शहराचा पर्यावरण अहवाल महापालिकेकडून दोन वर्षे तयार करण्यात आलेला नाही. तर वृक्षप्राधिकरण समितीचे कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर राहिला. आरोग्य विभागाचे हे अपयश मानावे लागेल. कारण दरवर्षी  एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर महापालिकेसह सरकारी आरोग्य खात्यांना जाग येते. यापुढे किमान याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात यंदा हत्तींचा पुन्हा उपद्रव सुरू झाला. चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांत हत्तींनी डेरा टाकला होता. वन विभागाने हत्तींबाबत जनजागृती चांगली केल्याने ग्रामस्थ आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी झाल्याचे चांगले चित्र दिसून आले. करवीर व हातकणंगले वनक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रमात गैरप्रकार समोर आल्याने चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. 

वृक्षारोपण उपक्रमाच्या चळवळीस एकप्रकारे हे गालबोट लागले.  राधानगरीमध्ये फुलपाखरांचे उद्यानाच्या कामास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने पर्यटकांचा ओढा या परिसरात वाढेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.