Tue, May 30, 2017 04:04
29°C
  Breaking News  






होमपेज › Kolhapur › पी. एन.-महाडिक यांची ‘मैत्री एक्स्प्रेस’ सुसाट

पी. एन.-महाडिक यांची ‘मैत्री एक्स्प्रेस’ सुसाट

By pudhari | Publish Date: May 20 2017 2:42AM






कोल्हापूर : प्रतिनिधी

माजी आमदार  महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी पुन्हा एकदा ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे...’ या शोले चित्रपटातील गाण्यांप्रमाणे आपल्या मैत्रीबाबत संकेत दिले आहे. तसेच यापूर्वी काही निवडणुकीत दोघांमध्ये मतभेद झाल्याचे स्पष्ट करत भविष्यात मात्र अशी चूक होऊ न देण्याचे भाकीत केले आहे. या दोघांच्या दोस्तान्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेसह करवीर आणि कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक -पी.एन.पाटील-अरुण नरके यांची गट्टी आहे. महाडिक यांना राजाराम कारखान्यात चेअरमन करण्यासाठी पी.एन.यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यश आले. आज दोन तपाहून अधिक काळ महाडिकांची कारखान्यावर सत्ता आहे. गोकुळ दूध संघातही अशीच परिस्थिती आहे. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणावर महाडिक-पाटील या जोडीने दबदबा ठेवला आहे. काळाच्या ओघात अरुण नरके हे या दोन्ही नेत्यांपासून दुरावले आहेत. त्यामुळे गोकुळवर सद्यस्थितीत महाडिक-पाटील यांचेच वर्चस्व आहे. 

मागील तीन दशके महाडिक-पाटील हे एकमेकांच्या सुख-दु:खात बरोबर राहिले आहेत. काहीवेळा दोघांमध्ये वितुष्ट आले तरीही टोकाला न जाता, त्यांनी समझोत्याची भूमिका घेतली. कधी पाटील तर कधी महाडिक यांनी पडती बाजू घेत एकमेकाला पूरक भूमिका घेण्याचे काम केले. महाडिक यांनी कधी पक्षविरोधी काम केले तरीही पाटील यांनी त्याकडे कानाडोळा केला.दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या सहकार्याने एन्ट्री केली. हळूहळू महाडिक-सतेज पाटील यांची मैत्री वाढत गेली.त्यातूनच सतेज पाटील यांनीही गोकुळमध्ये प्रवेश केला. मात्र पुढील काळात गोकुळच्या जागा वाटपावरुनच या दोघांमध्ये वितुष्ट आले. याचे पर्यावसन तीव्र राजकीय विरोधात झाले आहे. ही राजकीय धग सातत्याने वाढत चालली आहे.

खरे तर महादेवराव महाडिक, पी.एन.पाटील व सतेज पाटील हे तिन्हीही काँग्रेस पक्षाचेच सदस्य. मात्र या तिघांमध्ये सतेज पाटील विरोधात महाडिक-पाटील असाच सामना कायम रंगला आहे. हा सामना गोकुळच्या निमित्ताने कधी उघड तर विधानपरिषदेच्या निमित्ताने तो छुप्या पध्दतीने लढला गेला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पी.एन.पाटील हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा समज झाल्याने महाडिक यांनी काही प्रमाणात का असेना पण राष्ट्रवादीला बळ दिले. त्यामुळे पी.एन.पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष होवू शकले नाहीत. त्यामुळे दोघांमधील दरी वाढते की काय, अशी भिती होती. मात्र या निवडीनंतर हा विषयच बाजूला पडला. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी पी.एन.पाटील यांचे पुत्र राहूल पाटील यांची प्रबळ दावेदारी होती. राहूल पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी सतेज पाटील हे यंत्रणा लावत होते. तर विरोधी गटाकडून महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक या भाजपकडून प्रबळ दावेदार होत्या. मात्र संख्याबळाचा विचार करुन पी.एन.पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि महाडिक यांचा अध्यक्ष पदाचा मार्ग सुकर झाला.  अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे महाडिक-पी.एन.यांचे संबंध पूर्णत: बिघडणार, गोकुळमध्ये उभी फूट पडणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती ती साफ फोल ठरली.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे पी.एन.पाटील विरोधात महाआघाडी असा सामना झाला. महाआघाडीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांचा समावेश होता. तर सतेज पाटील यांचे समर्थक असलेल्या माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी वेगळी चूल मांडत पी.एन. यांना आव्हान दिले. निवडणूक प्रचार सुरु झाल्यानंतर पहिले दोन दिवस महाडिक यांचे समर्थक व गोकुळची यंत्रणा महाआघाडीच्या बाजूने प्रचारात होती.मात्र पी.एन.यांच्या मदतीला महाडिकांनी धावा घेतला. भाजपशी सख्य असतानाही महाडिक यांनी दोस्तीला जागत गोकुळची सर्व यंत्रणा पाटील यांच्यासाठी सक्रीय केली आणि पी.एन.यांनी या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारली.