Sun, Apr 21, 2019 13:57होमपेज › Kolhapur › गर्भलिंग निदानाचा संशय : तपासणीसाठी दप्तर ताब्यात

गर्भलिंग निदानाचा संशय : तपासणीसाठी दप्तर ताब्यात

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गर्भलिंग निदान आणि अल्पवयीन मुलीची प्रसूती होत असल्याच्या संशयावरून केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण समितीने शुक्रवारी कसबा बावड्यातील दोन दवाखान्यांचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले. गेल्या तीन महिन्यांत या दवाखान्यांमध्ये पुरुष जातीच्या अर्भकांची जन्मनोंदणी अधिक आढळल्याने समितीला गर्भलिंग निदान होत असल्याचा संशय असल्याचे समितीच्या सदस्या प्रियदर्शनी चोरगे यांनी सांगितले. 

कसबा बावड्यातील रत्ना पॉलिक्लिनिक व ज्ञानदीप हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे. अल्पवयीन विवाहितेचा पती मोहसिन बाकुद्दीन पकाली (रा. कागल) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. समितीचे सदस्य शिवानंद डंबल, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे, बालविकास अधिकारी नितीन म्हस्के, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, अ‍ॅड. गौरी पाटील यांच्या पथकाने या रुग्णालयांची पाहणी केली.

रत्ना पॉलिक्लिनिकमध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या प्रसूतींची माहिती समितीने घेतली. यामध्ये एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याचा प्रकार समोर आला. दवाखान्याच्या रेकॉर्डवर या मुलीचे वय 19 वर्षे दाखविण्यात आले आहे. समितीने या मुलीचे आधारकार्ड शुक्रवारी उपलब्ध केले असता, प्रत्यक्षात तिचे वय 17 वर्षे 5 महिने असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक होते, तसे न झाल्याने समितीने डॉ. तहसीलदार यांना संबंधित मुलीच्या पतीविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

नावांमध्ये तफावत
दवाखान्यात दाखल झालेल्या गर्भवतींऐवजी काही अन्य महिलांची नावे आहेत. रुग्णालय प्रशासन यामध्ये सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. प्रसूतीसाठी येणार्‍या प्रत्येक महिलेचे आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रसूतीनंतर मुलासोबत फोटो काढून तो दवाखान्याकडे जमा करावा लागणार असल्याचे बालकल्याण समितीच्या चोरगे यांनी सांगितले.

सीमाभागातील लोण...

सीमाभागातील काही दवाखान्यांमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी प्रसूतीनंतर अर्भकांच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. इचलकरंजीतही काही दिवसांपूर्वीच असा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे कारा समितीने अत्यंत काटेकोरपणे तपासणी सुरू केली आहे.