होमपेज › Kolhapur › अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांचे उद्या व्याख्यान

अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांचे उद्या व्याख्यान

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 1:24AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. 20) जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याखानमालेअंतर्गत हे व्याख्यान होणार आहे. ‘शाश्‍वत ऊर्जा सुरक्षा, आव्हाने व पर्याय’ या विषयावर डॉ. काकोडकर विचार मांडणार आहेत. शाहू स्मारक भवन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे राहणार आहेत.

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यंदाचे व्याख्यानमालेचे हे 30 वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, अभ्यासक आदींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत. तत्कालीन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री, दिवंगत प्रमोद महाजन, तत्कालीन नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आयोगाचे माजी सदस्य, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, खा. डॉ. नरेंद्र जाधव, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुुंखे, भारतीय सैन्य दलाच्या नॉर्दर्न कमांडचे तत्कालीन चीफ लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक, लेफ्टनंट जनरल अर्जुन रे, निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, निवृत्त एअर मार्शल अजित भोसले, राज्याच्या कारागृह विभागाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. य. दि. फडके, माधव गडकरी, द. मा. मिरासदार, ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी, कुमार केतकर, अरुण साधू, अरविंद गोखले आदींनी या व्याख्यानमालेत विचार मांडले आहेत.

रविवारी डॉ. अनिल काकोडकर ‘शाश्‍वत ऊर्जा सुरक्षा, आव्हाने व पर्याय’ या विषयावर या व्याख्यानमालेतील 30 वे पुष्प गुंफणार आहेत. मध्य प्रदेशातील बारावनी येथे 11 नोव्हेंबर 1943 साली जन्मलेल्या डॉ. काकोडकर यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेश येेथे झाले. माध्यमिक शिक्षण खारगाव येथे, तर दहावीनंतर ते शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबईच्या रूपारेल कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1963 साली व्ही.जे.टी.आय. मधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली. 1964 साली ते भाभा अणुसंशोधन केंद्रात रूजू झाले. 1969 साली त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली.

भाभा अणुसंशोधन केंद्रात ‘प्रक्रिया अभियांत्रिकी’ (रिअ‍ॅक्टर इंजिनिअरिंग) विभागात बनवण्यात येणार्‍या ‘ध्रुव रिअ‍ॅक्टर’मध्ये पूर्णपणे नवे आणि उच्च तंत्रज्ञान वापरून डॉ. काकोडकर यांनी मोलाची भर घातली. 1974  आणि 1998 च्या भारताच्या अणुचाचणी उपक्रमाच्या मुख्य पथकात त्यांचा समावेश होता. पुढे त्यांनी  भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याचा रिअ‍ॅक्टरवर काम करणार्‍या पथकाचेही नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट येथील जवळपास मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे डॉ. काकोडकर यांनी पुनरुज्जीवन केले. हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जाते.
भारताने ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, याकरिता स्वस्त आणि देशात सहजपणे उपलब्ध होणार्‍या थेरियमसारख्या स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न डॉ. काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने त्यांनी ठोस प्रगतीही केली. सध्या ते प्रगत जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहे. या भट्टीत थेरियम-युरेनिअम 233 याचा मूळ ऊर्जास्रोत म्हणून वापर होईल. प्लुटोनियम केवळ ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल, अशा भट्टीमुळे भारताच्या 75 टक्के ऊर्जेची गरज दूर होईलच; पण ऊर्जा मिळवण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.

डॉ. काकोडकर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यासह राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे ते सभासद आहेत. जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने त्यांना सन्माननीय सभासदत्व दिले आहे. न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप (एन.एस.जी.) चे सभासद म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्र सरकारने 1998 साली ‘पद्मश्री’, 1999 साली ‘पद्मभूषण’ व 2009 साली ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. यासह त्यांना विक्रम साराभाई, एच. के. फिरोदिया, एच. जे. भाभा, गोदावरी गौरव, फिक्की, रॉकवेल पदक, अ‍ॅनकॉन जीवनगौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेअंतर्गत होणारी व्याख्यानमाला निर्धारित वेळेवर सुरू होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता होणारे हे व्याख्यानदेखील वेळेवर सुरू होणार आहे. यामुळे वेळेपूर्वी 15 मिनिटे आधी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.