Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Kolhapur › शत्रू ठरलाय, आता तलवार खाली ठेवू नका

शत्रू ठरलाय, आता तलवार खाली ठेवू नका

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 12 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रा. संजय मंडलिक यांनी पहिल्यांदाच कळ काढली. सुरुवात तर झाली आहे, आता शत्रूही निश्‍चित आहे, शत्रूवर बोलायला सुरुवात करा, मी व मुश्रीफ तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही तलवार बाहेर काढलीच आहे, तर ती आता खाली येऊ नये याची दक्षता घ्या. लढायला तलवार कायम तळपतच राहू द्या, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी प्रा. संजय मंडलिक यांना केले. या सोहळ्यात घणाघाती भाषण करून प्रा. मंडलिक यांनी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. आता त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट करून कामाला लागावे, आम्ही सोबतच राहू, असे आ. हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक ते कळंबा फिल्टर हाऊस या रिंगरोडला महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या लोकनेते दिवंगत माजी खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या नामकरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते. सोहळा जरी नामकरणाचा असला, तरी मंडलिक, मुश्रीफ, सतेज पाटील एकाच व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या दिशेने आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली. 

आ. सतेज पाटील यांनी,  सदाशिवराव मंडलिक यांचे नाव मार्गाला देऊन त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचा सन्मान केल्याचे सांगत त्यांनी घालून दिलेली वाटचाल पुढे चालू ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रा. संजय मंडलिकांनी या द‍ृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रास्ताविकाच्या निमित्ताने प्रा. मंडलिक यांनी पहिल्यांदाच कळ काढली आहे. कधी ना कधी सुरुवात व्हायचीच होती. या निमित्ताने ती झाली हे बरे झाले. कळ काढलीच आहे, शत्रू ठरला आहे, तर बोलायला सुरुवात करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली. एकदा तलवार काढली की, मागे हटायचे नाही ही कै. मंडलिकांची शिकवण विसरू नका, असेही त्यांनी सांगितले. आता ताकदीने बाहेर पडा, नाहीतर आतापर्यंत आम्हीच कळ काढली आहे, आता तुम्ही पुढे व्हावे. कदाचित येत्या डिसेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील. जिल्ह्याच्या विकासाचे सदाशिवराव मंडलिक यांचे स्वप्न साकारण्यासाठी हातात घालून येथून पुढे एकत्रित लढू, अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली. 

गेल्या चार वर्षांत लोकसभेनंतर दिल्‍लीतून फार पैसा येईल, असे वाटत होते; पण 700 प्रश्‍न, 900 प्रश्‍न तेवढे झाले. चार वर्षांत दोन-तीन हजार प्रश्‍न झाले असतील; पण त्याची उत्तरे किती मिळाली, प्रश्‍नांची सोडवणूक किती झाली, याची आम्हाला काही कल्पना नाही. जनतेलाही माहिती नाही, असे सांगून आ. पाटील यांनी दिल्‍लीत लेटरपॅडवर सह्या केल्या की, प्रश्‍न टाकणारी यंत्रणा आहे, असे खुद्द राजू शेट्टी यांनीच आपल्याला सांगितल्याचे सांगितले. खरं-खोटं ते तुम्ही विचारून घ्या. हा संशोधनाचा विषय आहे. ज्या भूमीतून निवडून गेलो ते प्रश्‍न सुटले पाहिजेत. बाहेरच्या राज्याचे प्रश्‍न मांडून उपयोग नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तुम्हीच मरगळ झटकून कामाला लागा, असे आवाहनही आ. पाटील यांनी प्रा. मंडलिक यांना केले.

विमान वर घिरट्या घालतंय
प्रा. संजय मंडलिक यांनी प्रास्ताविकातच रात्री- अपरात्री विमान वर घिरट्या घालतंय, असे सांगितले. याचा धागा पकडून आ. सतेज पाटील यांनी विमान बास्केट ब्रिज आणि शिवाजी पुलाची वाट पाहतंय. कारण, विमानातून आलेला माणूस या ब्रिजवरून शहरात येणार. पर्यायी पुलावरून पुढे निघून जाणार आहे. खासदारांचे विमान काही खाली उतरणार नाही. गेल्या चार वर्षांत घोषणांच्या पलीकडे काहीच कोल्हापूरला मिळाले नाही. काहीही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

भूमिका स्पष्ट करून कामाला लागा

कै. मंडलिक यांंनी सवंग लोकप्रियतेसाठी काही केले नाही. नट-नट्या आणल्या नाहीत की, 9 कोटींचा रेडा आणून मिरवला नाही. खिशात पाच पैसे नसतानाही जिद्दीने जनतेच्या प्रेमावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्याही, अशा शब्दांत आ. हसन मुश्रीफ यांनी खा. धनंजय महाडिक यांचे नाव न घेता टोला हाणला. कै. मंडलिक यांना जे पटले तेच निर्भीडपणे केले. विचारांशी ठाम असलेल्या मंडलिकांनी लोकानुयासाठी मतासाठी कधी भूमिका बदलल्या नाहीत. आता प्रा. मंडलिक यांच्या मनात काय चाललंय माहीत नाही; पण त्यांनी घणाघाती भाषण करू न प्रचाराचा नारळ फोडला आहे. याचा आम्हाला आनंद आहे. आता त्यांनी लवकरात लवकर आपली पुढील भूमिका स्पष्ट करून कामाला लागावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महादेवराव आडगुळे, वीरेंद्र मंडलिक, आर. के. पोवार, युवराज पाटील, भय्या माने, राजू लाटकर, भुपाल शेटे, कृष्णात पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागल, मुरगूड नगरपरिषदेसह कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते.

प्रा. संजय मंडलिक यांनी ठोकला शड्डू

पुढे लोकसभा निवडणूक असल्याने मला कुणाचीही कळ काढायची नाही; पण कै. मंडलिकांप्रमाणे कोल्हापूरचे सगळे प्रश्‍न सोडवायचे आहेत. कोल्हापूरच्या ऋणात राहून पुढील कामे सोडवण्यासाठी संधी द्या, असे आवाहन करत प्रा. संजय मंडलिक यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला. कै. मंडलिकांना कायमच छुप्या हातांनी मदत केली, तशीच मदत आपल्यालाही मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्‍त केला. पंचगंगेच्या पाच नद्यांपैकी सरस्वती ही जशी गुप्‍त नदी आहे, तशीच मंडलिकांना मानणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे सर्वच पक्षांत आहेत. मग त्यात मुश्रीफ, सतेज पाटील गटातीलही आहेत. त्यामुळे आमचा शहरात गट नसतानाही शहरात सर्वाधिक मतदान घेऊन कै. मंडलिक निवडून आले. मागील निवडणुकीत ही मदत मिळाली; पण थोडक्यात विजय हुकल्याची खंतही प्रा. मंडलिक यांनी बोलून दाखवली.

असाही योगायोग
यशवंतराव मोहिते यांचे मानसपुत्र म्हणून डॉ. पतंगराव कदम व सदाशिवराव मंडलिक यांना ओळखले जात होते. मंडलिक व कदम दोघे जीवाभावाचे मित्र होते. त्यांच्या मृत्यूबाबतही विचित्र योगायोग जुळून आल्याचे प्रा. संजय मंडलिक यांनी आपल्या भाषणात नमूद केले. 10 मार्चला मंडलिक यांचा तिसरा स्मृतिदिन होता. याच दिवशी पतंगराव कदम हेदेखील अनंतात विलीन झाले.