होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शिक्षक समितीचे ‘भिक मागो’ आंदोलन (video)

कोल्हापूर : शिक्षक समितीचे ‘भिक मागो’ आंदोलन (video)

Published On: Mar 17 2018 4:34PM | Last Updated: Mar 18 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील मान्यताप्राप्‍त अनुदानित शाळेतील अतिरिक्‍त नैसर्गिक वाढीच्या मान्यता दिलेल्या 5973 तुकड्यांचे मूल्यांकन करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विनाअनुदानित वर्ग, तुकडी शिक्षक कृती समिती व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक राष्ट्रीय परिषदेच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय भीक मांगो आंदोलन केले. 

कृती समितीच्या वतीने नागपूर अधिवेशनात प्रलंबित मागण्यांसाठी धरणे, मोर्चा आंदोलने करूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे मागण्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. याच्या निषेधार्थ कृती समितीच्या वतीने शनिवारी (दि. 17) भीक मांगो आंदोलन करण्यात आले. शिक्षकांनी डोक्यावर पांढर्‍या टोप्या व हातात पेपरचे गठ्ठे घेऊन भीक मागत त्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेतले. ‘शासनाने तयार केलेला शिक्षकांचा नवा अवतार’,‘ भीक द्या अनुदानाची’,‘कृपा महाराष्ट्र शासनाची’, ‘ मी वेठबिगार शिक्षक’ अशा प्रकारचे डिजिटल फलक गळ्यात अडवून शिक्षकांनी शासन धोरणाचा निषेध केला.

शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून भीक मांगो आंदोलनास सुरुवात झाली. शासन अनुदान देत नाही म्हणून विनाअनुदानित शिक्षकांनी रस्त्यावर ये-जा करणार्‍या नागरिकांकडे हात पसरत भीक मागितली. शिवाजी पुतळा, सीपीआर, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय येथे आंदोलनाची सांगता झाली. यात शिक्षिकांचा सहभाग लक्षणीय होता. मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आले. आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष जिनेश पुरवंत, सीमा पाटील, सचिन परीट, प्रतिभा कुंभोजे, लक्ष्मण नेव्हाल, दादासाहेब लाड, संतोष आयरे, राजेंद्र कोरे आदी सहभागी झाले होते.

शाळा वर्ग, तुकड्यांचे मूल्यांकन होऊनही त्यांना अनुदान दिले जात नाही. सहा वर्ष विनाअनुदानित शिक्षक राबत आहेत. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री टोलवाटोलवी करीत आहेत. आम्ही कुणाकडे जायचे हा प्रश्‍न आहे. शासनाने मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शामराव लवांडे यांनी सांगितले.


Tags : kolhapur news, primary school, Teachers, kolhapur collector office