Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Kolhapur › महाडिकांविरोधात आ. मुश्रीफ, आ. पाटील यांनी फुंकले रणशिंग

महाडिकांविरोधात आ. मुश्रीफ, आ. पाटील यांनी फुंकले रणशिंग

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 12 2018 1:30AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

लोकसभेच्या कोल्हापूर आणि विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांत महाडिक कुटुंबीयांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी रविवारी रणशिंग फुंकले. दोघांनी एका व्यासपीठावर येत प्रा. संजय मंडलिक यांना तलवार म्यान न करता चिलखत आणि अंगरखा चढवा, असा सल्ला देत आम्ही तुमच्यासाठी फौज उभी करत आहोत, असा एल्गार केला. 
माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे नाव रस्त्याला देण्याच्या समारंभानिमित्ताने एकत्र आलेल्या आ. मुश्रीफ आणि आ. पाटील यांनी महाडिकविरोधी रणशिंग फुंकले.

लोकसभा आणि विधानसभेची रणधुमाळी अजून लांब असली तरी या दोघांनी जणू प्रचाराचाच नारळ फोडला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कै. सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक यांना बळ देण्याची घोषणा करीत आता मागे फिरू नका, असा आदेशही दिला. प्रा. मंडलिक कोणत्या पक्षातून लढणार, हे स्पष्ट नसले तरी त्यांना सक्रिय पाठिंबा हेच सूत्र असल्याचे या दोन्ही आमदारांनी रविवारी स्पष्ट केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून स्वतः लढण्याची घोषणा आ. पाटील यांनी केलीच आहे. त्यामुळे ‘एकमेका सहाय्य करू...’ प्रमाणे आ. पाटील यांनी प्रा. मंडलिक यांना आता मागे फिरायचे नाही, अशी जणू ताकीदच दिल्याचे रविवारच्या कार्यक्रमात स्पष्ट झाले.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजप नेते आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबर बैठक घेत कागल आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबरोबरच लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या या बैठकीनंतर आ. मुश्रीफ व आ. पाटील यांनी ‘हम भी कम नही’ असे दाखवून देत महाडिक यांच्या रणनीतीला आव्हान दिले आहे. लोकनेते सदाशिवराव मंडलिक रस्त्याच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने या दोघांनी जणू महाडिकविरोधी लढाईची ललकारी देत, आता घोडा मैदान दूर नाही, असा इशाराही दिल्याची चर्चा समारंभानंतर सुरू झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण व कागल मतदारसंघ लक्षवेधी ठरणार, हे निश्‍चित झाले.
निवडणूक पक्षीय स्तरावर लढली जाणार असली तरी प्रामुख्याने महाडिकविरोधात मुश्रीफ आणि पाटील, असेच चित्र राहणार हे रविवारच्या कार्यक्रमाने दाखवून दिले आहे. मुश्रीफ यांनी प्रा. मंडलिक यांना खासदार करणारच, असे जाहीर केले असताना आ. सतेज पाटीलही मंडलिक यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. आता अर्थातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण, त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचे सदस्य वाढवायचे आहेत. 

महाडिक पिता-पुत्र व पुतण्याची ताकद मिळणार भाजपला

मुश्रीफ आणि पाटील एकत्र येत असतानाच महाडिक पिता-पुत्र-पुतण्या यांची ताकद आपसूकच भाजपला मिळणार आहे. महाडिक काँग्रेसमधून निलंबित आहेत. मुश्रीफ आणि पाटील यांचा विरोध पाहता त्यांचे निलंबन रद्द होईल, असे दिसत नाही. त्यामुळे महाडिक यांच्यासह त्यांचे पुत्र आ. अमल महाडिक, पुतणे खा. धनंजय महाडिक आणि जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ताकद भाजपच्या पारड्यात जाणार, हे निश्‍चित मानले जात आहे.