Tue, Jul 23, 2019 16:40होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीमध्ये सगळं आलबेल नाही!

राष्ट्रवादीमध्ये सगळं आलबेल नाही!

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:52PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : रणधीर पाटील

कै. सदाशिवराव मंडलिकांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार... संजय मंडलिक यांना खासदार करण्याची ताकद देवाने द्यावी... यापुढे मंडलिकांच्या विचारांचे राजकारण करणार... आम्ही दोघे (मंडलिक गट व मुश्रीफ गट) एकत्र आलो, तर त्यांना ‘लीड’ तुटायचं नाही... गेल्या दहा ते पंधरा दिवसांत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांची वक्तव्ये बघितली की, कोणीही सांगेल की, राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलेबल नाही. आतापर्यंत आ. मुश्रीफ व खा. धनंजय महाडिक यांच्यात असणारी अंतर्गत धुसफुस आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खुलेआम सुरू आहे. 

खा. महाडिक यांची भाजपशी सलगीच वितुष्टाला कारणीभूत मोदी लाटेतही धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यात आ. मुश्रीफ यांनी निर्णायक भूमिका बजावली. खा. महाडिक यांनीही लोकसभेच्या विजयी मेळाव्यात तसे बोलून दाखवले; पण त्यानंतर आ. मुश्रीफ व खा. महाडिक यांच्यात ‘राजकीय ट्यूनिंग’ जमले नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीनंतर  माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भाजपशी सलगी वाढली. ताराराणी आघाडीचे महापालिका निवडणुकीत पुनरुज्जीवन करण्यात आले. भाजप-ताराराणी आघाडी महापालिका निवडणुकीत एकत्रित लढले. याचवेळी राष्ट्रवादी महापालिकेत एकाकी लढली. या लढाईत पक्षाचे खासदार म्हणून धनंजय महाडिक कुठेच सक्रिय दिसले नाहीत. उलट ताराराणी-भाजपची मोट  बांधून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीलाही सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून खा. महाडिक हे राष्ट्रवादीपासून आणि राष्ट्रवादीचे नेते विशेषकरून मुश्रीफ व कार्यकर्तेही महाडिक यांच्यापासून दुरावले. 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या ‘स्टेअरिंग’वर ताबा

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोडण्या सुरू असताना, दुसरीकडे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आ. अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान करण्यासाठी महादेवराव महाडिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच खा. महाडिक यांनीही पडद्यामागून सूत्रे हलवल्याचे उघड गुपित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी भाजप महाआघाडीच्या नवनियुक्त सदस्यांना घेऊन येणार्‍या ट्रॅव्हल्सचे सारथ्य करीत खा. महाडिक यांनी आपल्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली होती. 

महाडिक यांच्या निर्णयावर राष्ट्रवादीतील फूट अवलंबून

खा. धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत आपले राजकीय पत्ते खुले केले नाहीत. भाजपचे दिग्गज नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खा. महाडिक यांना भाजपमधून लढण्याचे जाहीर निमंत्रण दिलेले आहे. एवढेच नाही, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाडिक केंद्रात मंत्रीही होतील, असे भाकीत केले आहे. हे भाकीत खरे ठरायचे असेल, तर खा. महाडिक यांना भाजपमधून निवडणूक लढवावी लागेल, अशी सध्याची देशपातळीवरील राजकीय स्थिती आहे. खा. महाडिक यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीत उभी फूट पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राष्ट्रवादीतील महाडिक समर्थक, मुश्रीफ विरोधक आणि असंतुष्ट असे सगळेच बाहेर पडू शकतात. 

राष्ट्रवादीकडूनही पर्यायी व्यवस्था!

खा. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेच, तर ऐनवेळी लोकसभा उमेदवारासाठी धावाधाव होऊ नये, याची काळजी आ. मुश्रीफ यांच्याकडून घेतली जात आहे. त्यातूनच ते मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर लढलेले आणि अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या प्रा. संजय मंडलिक यांचे उमेदवारीचे घोडे मिळेल त्या व्यासपीठावरून पुढे रेटत आहेत. मंडलिक हे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार झाले, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंडलिक गटाची रसद आपल्यामागे राहील, याची तजवीजही मुश्रीफ यांच्याकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले, तर मुश्रीफ म्हणतात त्याप्रमाणे मंडलिक-मुश्रीफ गटाचे ‘लीड’ तोडणे कोणालाच जमणार नाही.