Mon, Mar 18, 2019 19:36होमपेज › Kolhapur › केएमटी तिकीट दरवाढीवर शिक्‍कामोर्तब

केएमटी तिकीट दरवाढीवर शिक्‍कामोर्तब

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:45AMकोल्हापूर ः सतीश सरीकर

दिवसेंदिवस तोट्याकडे धावणार्‍या केएमटीने (कोल्हापूर महापालिका परिवहन उपक्रम) ऊर्जितावस्थेसाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी व परिवहन समितीने त्यावर मंगळवारी शिक्‍कामोर्तब केले. पहिल्या टप्प्याला (स्टेज) एक रु. वाढ केली जाणार असल्याने किमान तिकीट 8 रु. होणार आहे. पुढील टप्यांना 2 ते 5 रु. वाढीचा प्रस्ताव आहे. 10 ऑगस्टपासून दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. वाढीतून दररोज 70 ते 80 हजार रु. जादा उत्पन्‍नवाढ अपेक्षित आहे.  

रोजचा तोटा तीन लाखांवर...

दररोज होणारी डिझेल दरवाढ, मेंटेनन्सचा खर्च, नोकर पगार, जीएसटीमुळे सुट्या पार्टस्च्या वाढलेल्या किमती, इन्शुरन्स व इतर टॅक्समध्ये झालेली वाढ आदींमुळे केएमटी तोट्यातून धावत आहे. त्यातच वडाप व एसटीची समांतर वाहतूक सुरू असल्याने त्याचा केएमटीला फटका बसत आहे. परिणामी, रोजचा तोटा सुमारे तीन लाखांवर गेला आहे. संचित तोट्याची रक्‍कम वाढतच आहे. सद्यःस्थितीत कर्मचार्‍यांचे पगार भागविण्यासाठीही प्रशासनाची तारांबळ उडत आहे. 

रोज साडेपाच लाखांचे डिझेल...

यापूर्वी 5 ऑक्टोबर 2013 ला तिकीट दरवाढ केली होती. सुधारित दराचा अंमल सुरू झाल्यानंतर समांतर वाहतूक करणार्‍या इतर प्रवासी वाहनांची म्हणजे अ‍ॅपे, मिनिडोअर, तीन आसनी रिक्षा आदींचे दर केएमटीच्या तुलनेत कमी राहिले. तसेच एस. टी. महामंडळाचे केएमटी मार्गावरील तिकीट दर टप्पा रचनेतील फरकामुळे प्रचंड तफावत असणारे निर्माण झाले. त्यामुळे 25 जानेवारी 2015 पासून तिकीट दर पुन्हा कमी करण्यात आले. सद्यःस्थितीत केएमटीला रोज सुमारे 7 हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी साडेपाच लाखांवर खर्च येतो. केएमटीच्या ताफ्यात 129 बसेस आहेत. त्यापैकी 105 बसेस कोल्हापूर शहर व परिसरातील 28 मार्गांवर धावतात. सुमारे एक लाख प्रवासी केएमटीतून प्रवास करतात. रोज त्यातून सुमारे 7 लाख 50 हजार ते आठ लाख उत्पन्‍न मिळते. केएमटीला 40 किलोमीटरपर्यंत 20 टप्प्यांत धावण्याची मंजुरी आहे. प्रत्येकी 2 कि.मी.चा असा एक टप्पा (स्टेज) आहे; परंतु केएमटीच्या वतीने 11 टप्पे तिकिटासाठी धरण्यात आले आहेत. 

एकदिवसीय पासची किंमत कमी

केएमटीच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एकदिवसीय पास योजना अंमलात आणली आहे. रोज सुमारे दोन हजारांवर पासची विक्री होते. 40 रुपयांना एक पास आहे. केएमटीने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव केला असला, तरी त्यातून एकदिवसीय पासला वगळण्यात आले आहे. तसेच या पासची किंमत 5 रुपयांनी कमी करून तो 35 रु. करावा, अशी शिफारस प्रस्तावात केली आहे. त्यामुळे एकदिवसीय पासची किंमत 35 रु. होईल. 

पासेसमध्येही होणार वाढ...

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या 155 रुपयांत महिन्याचा पास मिळतो; परंतु आता त्यात वाढ करून तो 250 रु. करण्यात आला आहे. आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा पास 210 वरून 350 रु. होणार आहे. अकरावी ते पदव्युत्तर व शिवाजी विद्यापीठाच्या इतर कोर्सेससाठीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीचे पास आहेत. तसेच 20 दिवसांत तीस दिवसांचा प्रवास या पासमध्येही वाढ केली आहे. तसेच साप्ताहिक पास, पाक्षिक पास, मासिक-त्रैमासिक पासमध्येही वाढ करण्यात आली आहे.  


केएमटीचे सध्याचे दर व कंसात नवीन दर

पहिला टप्पा - 7 रु. (8 रु.)
दुसरा टप्पा - 8 रु. (8 रु.)
तिसरा टप्पा - 10 रु. (10 रु.)
चौथा टप्पा - 11 रु. (12 रु.)
पाचवा टप्पा - 12 रु. (14 रु.)
सहावा टप्पा - 14 रु. (16 रु.)
सातवा टप्पा - 16 रु. (18 रु.)
आठवा टप्पा - 18 रु. (20 रु.)
नववा टप्पा - 19 रु. (22 रु.)
दहावा टप्पा - 20 रु. (24 रु.)
अकरावा टप्पा - 21 रु. (26 रु.)